बाप्पाला भावपूर्ण निरोप!

Sep 13, 2024 - 09:23
 0
बाप्पाला भावपूर्ण निरोप!

◼️ जिल्ह्यात 1 लाख 13 हजार 9 घरगुती, 19 सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन

रत्नागिरी : ‘निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...’ असे गार्‍हाणे घालत, गेले पाच दिवस अत्यंत भक्तिभावाने, आनंदाने गणरायाची सेवा करणार्‍या भाविकांनी गुरुवारी साश्रुनयनांनी गणरायाला निरोप देत, पुढच्या वर्षी लवकर या... अशी आर्त विनवणी केली. जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात भक्तगणांनी 1 लाख 13 हजार 9 घरगुती, तर 19 सार्वजनिक गणरायांना निरोप दिला. जिल्ह्यातील विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

गणेश चतुर्थीला शनिवार, 7 सप्टेंबर रोजी वाजत-गाजत अगदी पारंपरिक पद्धतीने जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर मंगळवारी घरोघरी गौराईचेही आगमन झाले. बुधवारी गौरीपूजन करून जिल्हाभरात सर्वत्र सण साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 867 घरगुती, तर 112 सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. भक्तगणांनी गौरी-गणपतीचा सण उत्साहात साजरा केला. घरी आलेल्या बाप्पाचे आणि गौराईचे स्वागत जेवढ्या जल्लोषात आणि जोशात झाले तेवढ्याच उत्साहात मात्र, हळव्या अंतःकरणाने गणेशभक्तांनी गुरुवारी गणरायासोबतच लाडक्या गौराईला देखील निरोप दिला.

रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. शहरासह साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, परटवणे आदी भागांमधील गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावली होती. गर्दी टाळण्यासाठी मांडवी समुद्रकिनार्‍यासह भाट्येकिनारी देखील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. विसर्जनावेळी मांडवी येथील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले होते. रत्नागिरीसह मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूरध्येही धुमधडाक्यात गणरायांना निरोप देण्यात आला. विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रेल्वे, बस, खासगी वाहनांनी ते मुंबईकडे रवाना होऊ लागले होते.

पारंपरिक ढोल-ताशांचा गजर
रत्नागिरीत पाच दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनासाठी देखील मांडवी समुद्रकिनारी पोलिसांचा मोठा फौजफाटा, सुरक्षारक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी कार्यकर्ते यांच्या मदतीने रत्नागिरीत विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक ढोल-ताशांच्या गजराचा थाट पहावयास मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow