रत्नागिरीतील आरोग्य व्यवस्था, आव्हानांवर आज परिसंवाद

Sep 2, 2024 - 09:34
 0
रत्नागिरीतील आरोग्य व्यवस्था, आव्हानांवर आज परिसंवाद

रत्नागिरी : रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न समोर येत आहेत. प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य सुविधांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रत्नागिरीमधील आरोग्य सुविधा, एकंदर व्यवस्था यासंदर्भात प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवण्यासाठी विचारमंथन व्हावं यासाठी भाजपा रत्नागिरीतर्फे परिसंवादाचे आयोजन केले आहे.

हा कार्यक्रम सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे. अनेक रुग्णांना रत्नागिरी सोडून कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये अधिक उपचारांसाठी जावे लागते. रत्नागिरीत पुरेसे डॉक्टर्स नाहीत का, त्यांच्यासमोर काय अडचणी आहेत, काय केले पाहिजे, जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, उपकरणांची आवश्यकता अशा विविध आयामांवर परिसंवादात चर्चा केली जाणार आहे.

या परिसंवादात आयएमए रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. अरुण डिंगणकर, डॉ. नीलेश नामाडे, डॉ. कल्पना मेहता या चार चतुरस्त्र डॉक्टरांचा सहभाग असणार आहे. रत्नागिरीतील जागृत नागरिकाने या परिसंवादाला उपस्थित राहावे व भाजपाने सुरू केलेल्या या मंथन प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जागृत नागरिकांनी यावे, असे आवाहन दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने आणि माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow