गुहागर : सुरक्षारक्षकांनी वाचवले समुद्रकिनारी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना बुडणाऱ्या सहा तरूणांचे प्राण

Sep 14, 2024 - 10:31
 0
गुहागर : सुरक्षारक्षकांनी वाचवले समुद्रकिनारी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना बुडणाऱ्या सहा तरूणांचे प्राण

गुहागर : गणेशमूर्तीचे विसर्जन करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे गुहागर समुद्रकिनारी काही तरुण समुद्रात ओढले गेले. तेथील सुरक्षारक्षकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने या तरुणांना पाण्याबाहेर काढले. सुरक्षारक्षकांचे प्रसंगावधान आणि त्यांनी दाखवलेले धाडस यामुळेच या तरुणांचे प्राण वाचू शकले.

गुरुवारी सायंकाळी दुगदिवी वाडीतील गौरी-गणपतीची मिरवणूक दुगदिवी मंदिरासमोरील पाखाडीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. भक्तिभावाने सर्व गौरी-गणपतींची समुद्रावर सामूहिक आरती झाली. त्यानंतर एकेक गणपतींची मूर्ती घेऊन तरुण समुद्रात विसजर्नासाठी जाऊ लागले. गणेश मूर्तीचे विसर्जन करुन समुद्रातून परतत असतानाच आलेल्या मोठ्या लाटेत पाच ते सहा तरुण समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावरुन समुद्राचे निरीक्षण करणारे सुरक्षारक्षक आशिष सांगळे, जगन्नाथ घोरपडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीने आपल्याकडील दोरखंडाला बोया बांधून तो खोल समुद्रात भिरकावला. पाण्याबाहेर पडण्यासाठी तरुणांचा प्रयत्न सुरु होता. त्याचवेळी दोरखंडाला बांधलेला बोया दोघांच्या हाती लागला. आता आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी या दोन तरुणांची धडपड सुरु होती. त्याचवेळी आणखी एक लाट आली. उर्वरित सहकारी देखील बोयाच्या जवळ आले. पण तोपर्यंत बोयाला बांधलेला दोरखंड समुद्रात जाऊ लागला. दोरखंड ओढणारे चार पाच सहकारी जवळपास छातीभर पाण्यात लाटा झेलत उभे होते. तितक्यातच आणखी १०-१२ जणांनी धावत जावून खोल समुद्रात जाणारा दोरखंड पकडला. पाण्यातील सर्व किनाऱ्यावर सुखरुप परतले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. 

दोरखंड ठरला आयुष्याची दोरी..

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सहा ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. प्रत्येक ठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मिरवणुकीने गौरी-गणपती विसर्जनासाठी आणले जातात. या सर्व ठिकाणी कोणतीही अघटित घटना घडू नये म्हणून नगरपंचायतीद्वारे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. या सुरक्षा रक्षकांकडे दोरखंड, बोया, लाईफ जॅकेट, शिट्टी असे साहित्य देण्यात आले होते. त्यांच्याकडे असलेला दोरखंडच त्या तरुणांच्या आयुष्याची दोरी ठरली.

या दोन सुरक्षा रक्षकांचा शुक्रवारी गुहागर नगरपंचायतीने सत्कार करुन त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकही केले. या घटनेनंतर गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांबरोबरच एक स्पीडबोट देखरेखीसाठी नियुक्त करण्याची विनंती गुहागर नगरपंचायतीला केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow