राजापुरात दीड वर्षानंतर मलेरियाचा शिरकाव

Sep 14, 2024 - 11:54
 0
राजापुरात दीड वर्षानंतर मलेरियाचा शिरकाव

राजापूर : सातत्याने पडणारा पाऊस आणि वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून तापसरीसह डेगीच्या साथीने तालुक्यात डोके वर काढले आहे. त्यामध्ये आता मलेरियाची भर पडली आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये मलेरिया झालेले चार रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाचे रुग्ण आढळण्याची तालुक्यातील गेल्या सुमारे दीड वर्षाच्या कालावधीमधील पहिली नोंद असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

शहरामध्ये या आजाराच्या साथीचा फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे यांनी नगर पालिकेकडे पत्राद्वारे  केली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनानेही तत्काळ शहरामध्ये औषध, धूरफवारणीसह अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊन तापसरी, डेंगीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्याच्या जोडीने तापसरीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

गतमहिन्यामध्ये तालुक्यामध्ये २५ डेंगीची लागण झालेले सण आढळून आले होते. त्यापैकी सर्व रुग्ण बरे झाले होते. दरम्यान, तापसरीची साथ आणि डेंगीचे रुग्ण आढळून येताच आरोग्य विभाग कमालीचा सतर्क झाला होता. डेगीच्या साथीसह अन्य जलजन्य रोगांचा फैलाव रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. घरोघरी भेटी देऊन विविध प्रकारची तपासणीही करण्यात येत आहे; मात्र ऐन गणेशोत्सवामध्ये ग्रामीण भागासह शहरामध्ये मलेरिया झालेले चार रुग्ण आढळून आले.

आरोग्य विभागाकडून दुजोरा
ग्रामीण भागासह शहरामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याच्या माहितीला आरोग्य विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांसह विविध भागातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ गावी आले होते. त्यांच्या संक्रमणातून मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या साथीचा फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow