Maharashtra Weather Update : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार ? वाचा IMD चा रिपोर्ट

Sep 19, 2024 - 12:11
 0
Maharashtra Weather Update : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार ? वाचा IMD चा रिपोर्ट

मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाला पुन्हा सुरूवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, हा पाऊस परत एकदा सक्रिय होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात शनिवार(२१ सप्टेंबर) पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हा पाऊस पडणार असून तेथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड व त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रीय झाला आहे.

त्यामुळे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्याचा परिणाम उत्तर मध्य प्रदेश व लगतच्या भागावर झाला असून त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजे १९, २०, २१ सप्टेंबर दरम्यान कोकणात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात २० व २१ सप्टेंबरला जळगावला तर २१ सप्टेंबरला अहमदनगर व सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात २० व २१ सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात २१ व २२ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात व विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १९ व २० सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खान्देशात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आज (१९ सप्टेंबर) रोजी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि २०) सप्टेंबर रोजी जळगाव जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर शनिवारी (दि २१) सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी (दि २२) संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांना सल्ला ?

* शेतकऱ्यांनी भेंडी आणि इतर भाज्यांवर कोरड्या हवामानात फवारणी करावी.

* भुईमुग, उडीद आणि मुग या पिकांची काढणी लवकरात लवकर करावी आणि कोरड्या व सुरक्षित जागी ठेवावे

* पावसाचे वातावरण लक्षात घेऊन पशुधन सुरक्षित जागी ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow