माजी आ. विनय नातूंच्या खेड खाडीपट्टा दौऱ्याने भाजपात चैतन्य

Sep 19, 2024 - 15:14
 0
माजी आ. विनय नातूंच्या खेड खाडीपट्टा दौऱ्याने भाजपात चैतन्य

खेड : खेड तालुक्यातील खाडीपट्टा हा पूर्वी युतीचा बालेकिल्ला होता. सन २००९ नंतर या बालेकिल्ल्याला घरघर लागली. तरीदेखील सन २०१४ साली केंद्रात व राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यास सुरुवात केली होती. सद्यस्थितीत गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूणसह कोकणात भाजपची ताकद वाढलेली आहे. लोकसभेत कोकणातील दोन्ही जागा या महायुतीच्या आहेत. तर धैर्यशील पाटील यांच्या सारखे उमदे नेतृत्व राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहे. त्यामुळे कोकणात भाजपची पर्यायाने महायुतीची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच मतदारसंघातील परिस्थिती पाहता गुहागर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार, हे निश्चित मानले

जात असून याच अनुषंगाने माजी आमदार नातू यांनी खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेरवल, मुमके, शिर्शी, रजवेल, कर्जी, आमशेत या गावातून स्थानिक ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. बाडी-वाडीतील अनेक ग्रामस्थांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गणेशोत्सव काळात खाडीपट्ट्यातील हिंद-मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांनी दोन्ही समाजात सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने उचलेले पाऊल हे यापुढे दोन्ही समाजात एकोपा राहण्यासाठी हितावह ठरेल, असे भाजपाचे खाडीपट्टयातील स्थानिक पदाधिकारी खालीद परकार यांनी यावेळी सांगितले.

या दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी नातू यांच्याकडे अनेक विकास कामांची निवेदने दिली, तर मुंबई येथून आलेल्या चाकरमान्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेले अनेक वर्षे दुर्लक्षित केलेली विविध विकासकामे पूर्ण करण्याची विनंती केली. अशी माहिती श्री. परकार यांनी त्यांच्या आमशेत येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

मुस्लिम बांधव सुखावले
नातू यांच्या या दौऱ्याने मुस्लिम बांधवदेखील सुखावले असून, त्यांच्या खाडी पट्ट्यातील या दौऱ्यात अनेक मुस्लिम मोहल्ल्यातील वयोवृद्ध मंडळींनी गुहागर मतदारसंघाचे आणि जनसंघाचे पहिले आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या प्रचारादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow