रत्नागिरीकरांच्या सेवेला कॅशलेस रुग्णालय : एक अभिनव संकल्पना

Sep 19, 2024 - 15:39
 0
रत्नागिरीकरांच्या सेवेला कॅशलेस रुग्णालय : एक अभिनव संकल्पना

रत्नागिरी : आरोग्य सेवा हा सर्वसामान्य रत्नागिरीकरांसाठी अत्यंत अवघडलेल्या जागेचे दुखणे असणारा दुखरा कोपरा आहे. भौतिक विकासाबरोबर नारळींच्या बागांमधून डोकावणारे रत्नागिरी शहर आता गगनाकडे उंचच उंच विकसित होत जात आहे. रस्ते अपुरे पडाव्या अशा गाड्यांची वर्दळ आणि वाढती लोकसंख्या याला सामावण्यासाठी शहरात आणि परिसरात रुग्णालयांची त्यातही अद्ययावत रुग्णालयांची संख्या वाढत आहे. शासकिय रुग्णालयाच्या इमारत आणि अद्ययावततेची वृत्त येत आहेत. शहरात पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्याने तर आता वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय सुविधा मिळतील अशी आशा वाढत आहे; मात्र प्रत्यक्षात आजही या शहरातील सर्वसामान्य माणूस उत्तम आरोग्य सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. तो इतर मोठ्या शहरातील आरोग्य सुविधांशी तुलना करून थांबत नाही तर थेट नजीकच्या कोल्हापूर, पुणे, मुंबई या शहरांकडे उत्तम आरोग्य सुविंधांसाठी धाव घेत आहे. विशेषतः मुंबई – पुणे येथील शासकिय रुग्णालयात मिळणाऱ्या अद्ययावत आणि किमान खर्चात तर कधी मोफत मिळणार्या आरोग्य सुविधांचे त्याला आकर्षण आहे. या शहरात त्या सुविधा कधी सुरू होऊ शकतील असे स्वप्न पडत असे; पण विश्वास नसे! आता हे स्वप्न वास्तवात साकर होण्याचा क्षण जवळ आला आहे.

रत्नागिरीकरांच्या मनाचा वेध घेणारी आणि त्यांच्या गरजेची अचूक नाडी ओळखणारी कॅशलेस कार्पोरेट सुपरमल्टीस्पेशालिटी आरोग्य सुविधाचे पर्व या शहरात सुरू होत आहे. ही अत्यंत आशादायी आणि अत्यानंदाची बातमी आहे. ठाणे येथील वैद्यकीय क्षेत्रात फार मोठे काम करणारा साधना फाऊंडेशन ट्रस्ट माध्यमातून हे अत्यंत अद्ययावत रुगणालय सुरू होत आहे. याची मूळ कल्पना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. त्यांनी अशा प्रकारचे कॅशलेस हॅास्पीटल ठाणे येथे सुरू केले आणि ठाणेकरांसाठी ते जणू वरदानच ठरले. गरीब सर्वसामान्य रुग्ण आज येथे एकही पैसा न देता वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना ही संकल्पना अत्यंत आवडली आणि रत्नागिरीकरांसाठी शहराच्या मध्यवर्ती अत्यंत प्रशस्त इमारतीत आकर्षक कार्पोरेट लूकमध्ये आणि अत्यंत अद्ययावत मशिनरी आणि तज्ञ डॅाक्टरांच्या सहकार्याने हे रुग्णालय लवकरच रत्नागिरीकरांच्या सेवेला रुजू होत आहे.

गरीब, सामान्य व्यक्तींसाठी आरोग्य सुविधा अंतर्गत शासनाच्या अनेक योजना असतात. अगदी खासगी रुग्णालयामार्फतही या योजनांचा लाभ दिला जातो. दुसऱ्या बाजूला जिल्हा शासकिय रुग्णालय सर्वसामान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी तत्पर असतात; मात्र त्यांचा प्रचंड कारभार आणि शासकिय यंत्रणेच्या अंतर्गत चालणारा व्याप विविध योजनांची अंमलबजावणी यात त्यांच्याकडून रुग्णांच्या अपेक्षा आणि वाढता बोजा सहन होण्यापलीकडे असतो. यांत रुग्णाला अद्ययावत सुविधा आणि तीही कार्पोरेट स्टाईलने आणि तरीही पूर्णतः कॅशलेस ही संकल्पना खरं तर अविश्वसनीय वाटते; परंतु ती प्रत्यक्षात अंमलात येत आहे. या हॅास्पिटलमध्ये कॅशकाऊंटरच असणार नाही हेच याचे वैशिष्ठ्य आहे.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल या नावाने सुरू होणाऱ्या रुग्णालयात अपघात व रुग्णनिदानाची सुविधा २४ तास उपलब्ध असेल. येथे अत्यंत अद्ययावत मशिनरीसह आयसीयू यूनिट आहे. देशातील अद्ययावत तंत्रज्ञान मानले जाणारे लॅमिनिअर फ्लो सुविधा असणारी दोन ॲापरेशन थिएटर आहेत. येथे कॅन्सर, केमोथेरपी, न्यूरो सर्जरी, हाडांचे ॲापरेशन्स, पाठीचा कणा, कंबर, स्पाईन स्पेशलायझेशन आदी सर्व प्रकारची ॲापरेशनस होणार आहेत. आज काल (गुढगा बदलणे) नी रिप्लेसमेंट ही मोठी समस्या आहे. या रिप्लेसमेंटचे ॲापरेशन्स ही येथे अगदी मोफत होणार आहेत.

युरॅालॅाजी स्पेशलायझेन हा विशेष विभाग कार्यरत असून याअंतर्गत किडणी आणि ब्लेंडर ट्रीटमेंट तसेच नेफ्रॅालॅाजी (किडनी), आपरेशन सुविधा आहेत. अद्ययावत डायलेसीस सेंटर आहे. जनरल सर्जरी, फिस्टूला, हार्निया, गॅाल ब्लेडर, ॲपॅन्डिक्स , पाईलस्स, फिशर या तर आहेतच.

सोबत नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, डिजीटल एक्सरे, सोनोग्राफी या सुविधां सोबत कॅाप्यूटराइज्ड लायब्ररोटरीज असून येथे रक्त, लघवी आदी विविध तपासण्या मोफत मिळणार आहेत. याही पुढे जात येथे जेनरीक औषधे आणि अनेक प्रकारची औषधेही पेशंटना मोफत देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पुढच्या काळात ‘दवाखाना आपल्या दारी’ या संकल्पनेतून सभोवतालच्या गावा- वाड्यातून फिरता दवाखाना सुविधा मोफत स्वरूपात परिसरात सुरू करण्याचा साधना फाऊंडेशनचा मानस आहे.

आजकाल इतक्या कार्पोरेट सुविधा, तज्ञ डॅाक्टर्ससह देणारे ट्रस्टमार्फत चालविले जाणारे सुपरमल्टीस्पेशालिटी रुग्णालय या सुविधा पूर्णतः मोफत देणार यावर खरं तर विश्वास बसत नाही; परंतु हे वास्तव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रकल्प पालकमंत्री उदय सामंत आणि साधना फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीतरांच्या सेवेला हाजीर होत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow