Ratnagiri Crime News : मृतदेहानेच स्वप्नात येऊन दिली मृत्यूची खबर? तरुणाच्या दाव्याने पोलिसही गेले चक्रावून; भोस्ते घाटातील प्रकार

Sep 20, 2024 - 10:08
Sep 20, 2024 - 10:31
 0
Ratnagiri Crime News : मृतदेहानेच स्वप्नात येऊन दिली मृत्यूची खबर? तरुणाच्या दाव्याने पोलिसही गेले चक्रावून; भोस्ते घाटातील प्रकार

खेड : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी या मानवी अवशेषांचा तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी काल संध्याकाळी सापडली असतानाच आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी जंगलात मृतदेह असल्याचे स्वप्न पडले. त्याने ते खेड पोलिसाना येऊन सांगितले आणि त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलल्याचा चमत्कारिक प्रकार पुढे आला आहे.

अशीच नोंद पोलिसांच्या एफआयआरमध्ये सुद्धा करण्यात आली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १७ सप्टेंबर २०२४ ला योगेश पिंपळ आर्या (३०) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलिस ठाण्यात दाखल झाली. डोंगरात पुरुषाचे प्रेत असून, तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे, असे त्याने सांगितले. योगेश आर्याच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली.

भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून ५ फुटावर एक कवटी सापडली.

मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ एआ कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिस करत आहेत.

मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा, असे असताना त्याची खबर स्थानिकांना न लागता थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची खबर स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलिस मृतदेह शोधतात ही गोष्ट विचार करायला लावणारी आणि अचंबित करणारी आहे. यातून आता कोणते गूढ खेड पोलिस उलगडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 20-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow