देवरूख नगरपंचायतीत 'एक पेड माँ के नाम' अभियान सुरू

Sep 20, 2024 - 13:20
 0
देवरूख नगरपंचायतीत 'एक पेड माँ के नाम' अभियान सुरू

साडवली : प्रधानमंत्री भारत सरकार यांनी 'एक पेड माँ के नाम' या अभियानांतर्गत वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली आहे. या कार्यक्रमांतर्गत देवरूख नगरपंचायतीतर्फे माटे-भोजने सभागृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

नगरपंचायतीच्या मोहिमेचे उद्घाटन मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी तसेच महिला व बालविकास विभागाकडील अधिकारी व माजी नगरसेवक संतोष केदारी उपस्थित होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी उष्णतेत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. दरवर्षी नगरपंचायतीच्या माध्यमातून देशी वृक्षांची लागवड केली जाते. यंदा अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प आणि सूचना प्रशासनाकडून केल्या आहेत. त्यानुसार एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत नगरपंचायतीतर्फे शासनाच्या निर्देशानुसार वृक्षारोपण व संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या वेळी माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली तसेच स्वच्छता ही सेवा २०२४ या उपक्रमांतर्गत देवरूख शहरात स्वच्छता कार्यक्रम राबवणे, विविध प्रकारच्या स्पर्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई कीट वाटप करणे, आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन वसुंधरेप्रती कृतज्ञता दाखवावी, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी केले.

पर्यावरण संरक्षणासाठी अभियान
वृक्षतोडीमुळे दरवर्षी उष्णतेत वाढ होत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. भारत सरकारने 'एक पेड माँ के नाम' या अभियानातून वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow