रत्नागिरीतील दीड हजार गावे 'पब्लिक अलर्ट सिस्टम'ने जोडणार

May 24, 2024 - 11:25
May 24, 2024 - 12:05
 0
रत्नागिरीतील दीड हजार गावे 'पब्लिक अलर्ट सिस्टम'ने जोडणार

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हा प्रशासन अधिक सजग झाले असून, आपत्तीबाबत तत्काळ माहिती मिळण्यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 538 महसुली गावे पब्लिक अलर्ट सिस्टमने जोडण्याचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांना दिला आहे. 

जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी कीर्ती कीरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापनचे अजय सूर्यवंशी, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत हवामान खराब असल्याने यावेळी उपस्थित राहू शकले नाही. ते ऑनलाईन या मिटिंगला होते.

यावेळी मिर्‍या-नागरपूर महामार्ग पावसामुळे माती रस्त्यावर येऊन निसरडा झाल्याने धोकादायक झाला आहे. शहरातील गटारांची स्वच्छता, मिर्‍या बंधार्‍याचा उर्वरित टप्पा, मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचे काम, शहरातील पाणी प्रश्न, वाशिष्टीच्या गाळाचा प्रश्न आदींवर प्रत्यक्ष भेटी देऊन योग्य ते उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, पालकमंत्री सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेतली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही प्रत्यक्ष भेटी देऊन त्यावर तोडगा काढणार आहोत. ठेकेदारांसह संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांना सोबत घेणार आहे. पावसाळ्यात काही गंभीर समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी मिर्‍या-नागपूर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. ठेकेदार रवी इन्फ्रा, म्हात्रे यांच्याशी बैठक घेऊन त्यांना ताकीद दिली जाणार आहे. चिखल होणार्‍या ठिकाणी तत्काळ उपाय करण्याचे आदेश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. शहरातील गटारांची स्वच्छता झाली आहे का, काँक्रिटीकरणामुळे जे काही प्रश्न निर्माण होणार आहेत, त्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. शीळ धरणातील पाण्याचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. मिर्‍या बंधार्‍याचा एक टप्पा राहिला आहे, त्याला भेट देऊन पत्तन विभागाला आदेश दिले जातील. महावितरणची दिवसातून दोन वेळा आढावा बैठक घेतली जाईल, दापोली, राजापूर-खेड, चिपळूण, रत्नागिरी अशा आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. पालकमंत्र्याच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये आले असून, प्रत्यक्ष भेटी देऊन या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

सुट्टी असूनही कामाला प्राधान्य

जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासह महावितरण, बांधकाम व पाटबंधारेच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असूनही तातडीने विविध ठिकाणी पाहणी केली आणि ठेकेदारांना सूचना केल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow