रत्नागिरीत बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनची निदर्शने

Sep 21, 2024 - 10:37
 0
रत्नागिरीत बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनची निदर्शने

देवरुख : बँक ऑफ इंडियामधील फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन संघटनेने आपले प्रलंबित असलेले प्रश्न तडीस नेण्यासाठी बँक व्यवस्थापना विरुद्ध आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन १२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत चालू राहील. यानंतर बँक व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीतर ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर असे दोन दिवस सलग संप पुकारण्यात आला आहे.

हे आंदोलन प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या पुढील न्याय हक्कासाठी आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देता यावी यासाठी क्लार्क, शिपाई व आर्मगार्ड यांची पुरेशा प्रमाणात नोकर भरती करणे, अनेक शाखांमध्ये एकच क्लार्क कम कॅशिअर आहे. बहुतांशी शाखांमध्ये शिपाईच नाही आहे. शाखा सुरक्षित राहण्यासाठी आर्मगार्ड यांची भरतीच गेली कित्येक वर्षे केलेली नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज करून विनंती बदली मागितली आहे त्यांच्या बदली ऑर्डर काढणे.

बँकेने औद्योगिक विवाद कायद्याचे उल्लंघन करू नये, त्याच बरोबर बँक व संघटना यामध्ये अंतर्गत करार झाले आहेत त्याचे उल्लंघन करू नये. त्याचे पालन झाले पाहिजे, कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करू नये. सध्या सर्व प्रकारात आऊटसोर्सिंग चालू आहे. ते बंद करावे.

व्यवस्थापनाचे कामगार विरोधी / पक्षपाती धोरण असणे. या आंदोलनाच्या कार्यक्रमानुसार बुधवार दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता क्षेत्रीय कार्यालय, शिवाजी नगर, रत्नागिरी समोर संघटनेने आपल्या मागण्याचे फलक दाखवून शांतपणे निदर्शने केली.

ही निदर्शने यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी शहरातील महिला सभासदांसहित तसेच रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाखांमधील सभासद उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड विनोद कदम सेक्रेटरी, कॉम्रेड मनोज लिंगायत उपाध्यक्ष तसेच संघटनेचे कमिटी सदस्य मयूर चाफले, प्रथमेश किनरे, विक्रांत राणे यांनी केले. यावेळी रत्नागिरी शहरातील शाखांमधून ५० जण उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow