लांजा : कोत्रेवाडीतील ग्रामस्थ टाकणार निवडणुकांवर बहिष्कार

Sep 21, 2024 - 11:17
 0
लांजा : कोत्रेवाडीतील ग्रामस्थ टाकणार निवडणुकांवर बहिष्कार

लांजा : ग्रामस्थांचा विरोध डावलून कोत्रेवाडी येथे जबरदस्तीने डंपिंग ग्राऊंड प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात लांजा नगरपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार अर्ज आणि आंदोलने करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आगामी विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीजवळ डंपिंग ग्राऊंड प्रकल्प लादून जनजीवन उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय, नगरपंचायतीकडे अनेकवेळा तक्रार केली. त्यासाठी अनेकवेळा या विरोधात आंदोलने, उपोषणेही केली; मात्र ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता हा प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नगरपंचायतीकडे घनकचरा प्रकल्पासाठी अन्य जागांचे प्रस्ताव असतानाही नगरपंचायत कोत्रेवाडी या एकाच जागेवर अडून बसली आहे. या प्रस्तावित जागेकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत रस्ता नाही आणि लगतच जलस्रोत आहेत तसेच वाडीवस्ती जवळ आहे. या जागेची पाहणी जिल्हा समितीने करून शासनाच्या निकषात अयोग्य असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला आहे. तरीही नगरपंचायत कोत्रेवाडी येथील जागेचा अट्टाहास सोडण्यास तयार नाही. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे; मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोत्रेवाडी ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर, संतोष कोत्रे, रवींद्र कोत्रे आदींनी दिली. याबाबत तहसील, नगरपंचायत व प्रशासनाला निवेदन देऊन ग्रामस्थ निषेध व्यक्त करणार आहेत.

नगरपंचायतीने शहरातील कोत्रेवासीयांचा विश्‍वासघात केला आहे. कचराप्रकल्प कोत्रेवासीयांवर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला हा प्रकल्प रद्द करतो, असा आशावाद दाखवला; मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीच केले नसल्याने आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे. - मंगेश आंबेकर, ग्रामस्थ, कोत्रेवाडी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 21-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow