पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला; पहिली सही शेतकऱ्यांसाठी, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'

Jun 10, 2024 - 12:25
 0
पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला; पहिली सही शेतकऱ्यांसाठी, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार 'निधी'

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.९) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता देशात मोदी सरकार ३.० सुरू झाले आहे. शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास १६ तासांनी नरेंद्र मोदींनी या कार्यकाळातील पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पीएम किसान निधी सन्मान योजनेशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी केली. पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वाक्षरी केली आहे. या योजनेंतर्गत जवळपास २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ज्याचा फायदा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

यावेळी, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यामुळे स्वाक्षरी करण्यात येणारी पहिली फाईल ही शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असावी, हे उचित होते. आगामी काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिकाधिक काम करण्याची आमची इच्छा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळाने रविवारी शपथ घेतल्यानंतर सोमवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. हे दोन्ही निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घेण्यात आले आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दोन कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी मिळू शकते. त्याचवेळी, आणखी एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत सुमारे ५० टक्के वाढ केली जाऊ शकते.

नरेंद्र मोदींसह ७२ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
रविवारी मोदी सरकार ३.० चा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुणे तसेच देशभरातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा सर्वात मोठा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow