Union Minister Ramdas Athawale: देशाला कॉक्रोच जनता पक्षाची काही आवश्यकता नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
नीट परीक्षा पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पक्षाने दिल्लीत आंदोलन केले. यानंतर देशातील अनेक ठिकाणी कॉक्रोच जनता पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून पाव रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, पेपरफुटीबाबत विविध राज्यांत कारवाई सुरू असून, अनेकांना पकडले आहे. केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही. भविष्यात असा घोटाळा होऊ नये म्हणून दिपके यांनी सरकारला योग्य सूचना कराव्यात आणि बौद्ध-दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करावे, असे आठवले यांनी सांगितले.
देशाला कॉक्रोच जनता पक्षाची आवश्यकता नाही
देशात भारतीय जनता पक्ष खंबीरपणे काम करत आहे. त्यामुळे देशाला दुसऱ्या कॉक्रोच जनता पक्षाची अजिबात आवश्यकता नाही. अर्थात, लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, असा मोठा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. केंद्रात काम करताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या साथीमुळेच मला सत्ता आणि पद मिळाले असून, रिपाइं त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहील, असा शब्दही रामदास आठवले यांनी दिला.
दरम्यान, शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये. मी त्यांना पूर्वीच तसा सल्ला दिला होता. परंतु, आता काँग्रेसमध्ये काही दम राहिलेला नाही. काँग्रेसला चांगले भविष्य दिसेल, अशी परिस्थिती नाही. शरद पवारांना काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावे. NDA मध्ये शरद पवारांनी येणे आवश्यक आहे. अजित पवार एनडीएमध्ये आले, आज अजितदादा असते, तर कदाचित शरद पवारही एनडीएमध्ये आले असते. त्यांना जर भाजपासोबत जायचे नसेल, तर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत यावे. मी त्यांना तिकडे घेऊन जातो, अशी ऑफर रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 15-06-2026














