३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; ५८७ पीएच.डी. संशोधकांचा समावेश; शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींची विशेष उपस्थिती
नवी दिल्ली: PM Modi at IIT Delhi Convocation (पंतप्रधान मोदी आयआयटी दिल्ली दीक्षांत समारंभ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यात ५८७ पीएच.डी. (Ph.D.) संशोधकांसह ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, “तुम्ही आयुष्यातील एका अत्यंत अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घेत आहात,” असे सांगत ‘जो शिकेल, तोच जिंकेल’ असा महत्त्वपूर्ण कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. कोविड काळात झालेल्या संवादाची आठवण करून देत, यापूर्वी आपण व्हर्च्युअल माध्यमातून भेटलो होतो, मात्र आज प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद वेगळाच असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“कॅम्पसच्या आठवणी तुमच्या आयुष्याचे मोठे असेट”
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अनेक मित्र आपल्या पहिल्या स्टार्टअपचे स्वप्न पाहत असतील, तर कोणी पुढच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले असेल. प्रत्येकाचा मार्ग आणि स्वप्न वेगळे असले, तरी आज सर्वांच्या मनात एकच समाधान आहे. आयआयटी दिल्लीतील तुमचा पहिला दिवस, ओरिएंटेशन आणि आजचा कन्वोकेशनचा दिवस यात प्रचंड प्रवास दडला आहे. आजचा हा क्षण पूर्णपणे जगून घ्या.”
होस्टेलच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी कुमाऊ, आरा, कारा, बिंडी, नील, कैलास, हिमाद्री या हॉस्टेलचे उल्लेख केले. “इंटर हॉस्टेल कॉम्पिटेशनचे किस्से आणि जुने तंटे या केवळ शिक्षणाच्या गोष्टी नसून, येणाऱ्या काळात जबाबदाऱ्या वाढतील तेव्हा या आठवणी तुम्हाला ऊर्जा देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला खास सल्ला
भावूक वातावरणात विद्यार्थ्यांना खास सल्ला देताना पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा जेव्हा जीवन तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा लक्षात ठेवा की हे कॅम्पस, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमचे कुटुंब बनले आहे. तुमच्या प्राध्यापकांनी तुमच्या भविष्याला आकार दिला आहे.”
“आपल्या प्रत्येक यशात या सर्वांचे योगदान लक्षात ठेवा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा. या आठवणींना ‘असेट’ (मालमत्ता) म्हणून सोबत घेऊन जा, कधीही विसरू नका. इथून निघताना एकमेकांना नक्की भेटा आणि आयुष्यभरासाठी हे नाते असेच जपून ठेवा,” असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पदवीधरांना केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 08-08-2026














