रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनची नजर: अवैध मासेमारी रोखण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही दिवसात अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे, यामागे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने सुरू करण्यात आलेली ड्रोन प्रणाली कार्यक्षम ठरली आहे. 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात साखरीनाटे आणि भाट्ये या दोन ठिकाणी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे गेल्या ५ दिवसात अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये समीर अ. गफूर वस्ता यांची नौका “मोहम्मद सैफ” क्र. (IND-MH-4-MM-676 2) आणि श्रीम. जबीन कमाल होडेकर यांची नौका “अल कादरी” क्र. IND-MH-4-MM-1635 या दोन नौकांवर 10 वावाच्या आत ट्रॉलिंग पध्दतीने अनधिकृत मासेमारी करण्याच्या आरोपात कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची नौका “यासीर अली- II” क्र. IND-MH-4-MM-5962 विनिर्दिष्ट क्षेत्रात पर्ससिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अन्वये या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे कायद्यांतर्गत अटी शर्तीचा भंग करून मासेमारी करु नये असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.), रत्नागिरी कार्यालयाकडून सूचित करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 15-01-2025

tata motars