चिपळूण नगर परिषद तयार करणार ग्रामीण संस्कृतीसह मराठी भाषेतील दुर्मीळ शब्दसंग्रह ग्रंथ

चिपळूण : ग्रामीण संस्कृतीसह मराठी भाषेतील लोप पावत असलेल्या दुर्मीळ शब्दसंग्रहाचे जतन करण्याच्या दृष्टीने चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत दि. १३ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत दुर्मीळ शब्दसंग्रह ग्रंथ तयार करण्याच्या कामाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील व मराठी भाषेतील प्रचलित शब्द व लोप पावत असलेल्या भाषा, शब्दांची माहिती जमा करून न.प. कडे देण्याचे आवाहन न.प.ने केले आहे.

महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम १९६४ नुसार मराठी ही आपली राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार १४ मार्च २०२४च्या निर्णयाप्रमाणे राज्याच्या मराठी धोरणास मान्यता मिळाली आहे.

मराठी भाषा प्रचार व संवर्धनासाठी तसेच मराठी वाचन संस्कृती वाढविण्याकरिता दरवर्षी दि. १४ ते २८ जानेवारी या काळात मराठी भाषा पंधरवडा राबविला जातो. कवी वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे. हा दिवस मराठी भाषा म्हणून तर १ मे हा दिवस मराठी राजभाषा दिन, २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन या सर्व पार्श्वभूमीवर तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर लोप पावत असलेली ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्यासाठी चिपळूण न.प.च्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथाचा उपयोग जिज्ञासू अभ्यासक, ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा अर्थ जाणून घेणे, मराठी भाषेतील शब्दसंपदा वाढविणे, दैनंदिन व्यवहारामध्ये हे शब्द उपयोगात आणणे, ग्रामीण साहित्य निर्मिती यासाठी होणार आहे. शहरासहीत ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या घरातील, गावातील ज्येष्ठ सदस्य (आजी-आजोबा) यांच्यासोबत त्या- त्या काळातील किमान दहा शब्द, पाच ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार, लोकगिते व दैनंदिन व्यवहारातील शब्दोच्चार यांची नोंद व संकलन करून स्वतःचे नाव, शब्द संकलन करतानाचे फोटो चिपळूण न.प. कडे वेळेत द्यावेत. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.

Mahrashi karve ANM

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 22/Jan/2025