मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला भलामोठा व्हेल मासा

मालगुंड : गणपतीपुळे जवळील मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी एक भलामोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. काही दिवसांपूर्वीच या माशाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेला हा मासा किनाऱ्यावर पोहोचला, मात्र तो प्रचंड मोठा असल्याने लाटांमध्येच अडकून राहिला. समुद्राची ओहटी सुरू झाल्यावर हा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ गणपतीपुळे पोलीस चौकीशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल ओंकार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर वनविभागाचे वनक्षेत्रपाल कांदळवन किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडू, कर वनरक्षक प्राजक्ता चव्हाण, शुभम भाटकर, प्रकल्प समन्वय पशुधन पर्यवेक्षक निलेश वाघमारे आणि कासव मित्र आदर्श मयेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.

मृत व्हेल मासा किनाऱ्यावरून बाहेर काढण्यासाठी पोलीस, वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे मदत केली.

त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी मोठा खड्डा खोदून या मृत व्हेल माशाची योग्य विल्हेवाट लावली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 10-04-2025