भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी स्ट्रिंग ऑपरेशन करणं महागात, आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

मालवण : आमदार नीलेश राणे यांनी भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन प्रकरणी मालवण पोलिसात नीलेश राणे यांच्यासह तीन ते चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याची माहिती आमदार राणे यांनीच माध्यमांना दिली. याला रवींद्र चव्हाण कारणीभूत असल्याचे सांगत, असले दबाव टाकून मी डगमगणार नाही. त्यांनी मला अजून ओळखले नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर हे थांबवलं नाही तर अजून बरंच टोकाला जाणार असल्याचा इशारा आमदार नीलेश राणे यांनी दिला.

राणे म्हणाले, माझ्या सह काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या संदर्भातील आम्हाला नोटीस दिली आहे. अशा अजून दहा केसेस जरी माझ्यावर झाल्यात तरी मी डगमगणार नाही. पुढचे जे काही तीन-चार दिवस आहेत, मी यांना सोडणार नाही. ते काय कारवाई करतात हे मला पहायचे आहे. या सर्व प्रकारामागे रवींद्र चव्हाण आहेत. त्यांचा माझ्यावर राग आहे. मी अन्य कुठल्याही नेत्याला जबाबदार घरणार नाही. असेही ते म्हणाले.

पोलिसांकडून माहिती देण्यास नकार

विजय केनवडेकर यांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे का. राणे यांच्यावर कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे याबाबत माध्यमांनी मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

ही फक्त सुरुवात

राणे म्हणाले, आम्ही गुन्हा पकडून दिला असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे सोडून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. आज ते मोकाट आहेत. त्यांना जर वाटत असेल की, मी या दबावला बळी पडेन तर त्यांनी मला अजून ओळखलेलं नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर हे थांबवलं नाही अजून बरंच टोकाला जाणार आहे.

..मग अटक करा

माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे. नुसती नोटीस देऊन कसं होईल. पुढची प्रोसिजर अटक आहे ना. मग ती पण करा. मी जामिनासाठी अर्ज करेन तेव्हा करेन. तुम्ही तुमची प्रोसिजर करा. मला सर्व माहीत आहे. आपण काय करणार आहात. मलाही हे पहायचे आहे. माझ्यावर असले दबाव टाकून मी डगमगणार नाही किंवा कुठेही मागे हटणार नाही.

माझ्या आजूबाजूला हेर लावले

रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व होत आहे. मी इतके दिवस हेच सांगतच आलो आहे. ते आणि त्यांचा सहाय्यक किती वेळा आणि कुणाकुणाला फोन करतात. ते कुणाकुणाच्या टचमध्ये आहेत हे सर्व मला माहीत आहे. त्यांनी माझ्या आजूबाजूला हेर लावलेले आहेत. माझ्यावर अजून दहा केसेस टाकल्या तरी चालतील. मला जे काही करावयाचे आहे ते मी करणार.मला जे काही दिसतय, मला जिथे पोहोचायचे आहे तिथे मी पोहोचणारच. पोलिसांनी मला थांबवून दाखवावेच. तुम्ही कितीही मला कैचीत पकडायचा प्रयत्न केला तरी मी चक्रव्यूहामध्ये अडकणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 29-11-2025

Shanti 3