मी एकटा पडलोय, मराठा जात संकटात; 6 तारखेपर्यंत सगळी कामं उरकून घ्या; मनोज जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन

Jun 24, 2024 - 11:48
 0
मी एकटा पडलोय, मराठा जात संकटात; 6 तारखेपर्यंत सगळी कामं उरकून घ्या; मनोज जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन

त्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात (Maratha Reservation) संकटात सापडली आहे.

आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. त्यासाठी 6 जुलैपासून सुरु होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर आगपाखड केली. आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरले आहे. मी एकटा पडलो आहे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. पण मराठा समाजाने एकजूट राहावे, ही माझी विनंती आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

ओबीसी नेत्यांना निवडणुकीपेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचं: मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाच्या नेत्यांनी फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे. ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जातीचं आरक्षण महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

त्यामुळे मराठा जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आवाहन आहे की, 6 ते 13 जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या डोळ्यांदेखत लेकरांचं वाटोळं होऊन देऊ नका. 6 तारखेपर्यंत मराठ्यांनी आपली सर्व कामं उरकून घ्यावती. 6 जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता शांतता जनजागृती रॅलीला उपस्थित राहावे. कोणीही गावाच्या बाहेर किंवा लग्नकार्याला जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्यातील जनजागृती रॅलीला ताकदीने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय, आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलोय, पण मी मागे हटत नाही. मी मेलो तरी हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देईन, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 24-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow