'जोपर्यंत ते पद आहे तोपर्यंत तुम्हीच मुख्यमंत्री राहिलं पाहिजे '; सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेंकडून एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं

Jul 1, 2024 - 14:18
Jul 1, 2024 - 15:30
 0
'जोपर्यंत ते पद आहे तोपर्यंत तुम्हीच मुख्यमंत्री राहिलं पाहिजे '; सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेंकडून एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं

मुंबई : धर्मवीर सिनेमाच्या यशानंतर धर्मवीर -2 (Dharmaveer 2) सिनेमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रविवार 30 जून रोजी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं.

धर्मवीर-2 : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं या सिनेमाचं नाव आहे. तसेच येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सिनेमातील कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी देखील उपस्थित होती. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar), महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यासह बॉबी देओल ही मंडळी उपस्थित होती. यावेळी सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं बरंच कौतुक केलं.

मंगेश देसाई यांनी सिनेमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांनी दहा वर्ष मुख्यमंत्री राहिलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर या गोष्टीला महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांनी देखील दुजोरा देत, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 30 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दोन वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने कलाकारांना त्यांचं अभिनंदन देखील केलं.

सचिन पिळगांवकरांनी काय म्हटलं?

सचिन पिळगांवकरांनी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी पहिला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता, असंही म्हटलं. यावेळी त्यांनी प्रसाद ओकच्या अभिनयाचंही कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, लोकांना मुख्यमंत्री साहेबांचं तरुणपण पाहायला मिळालं. ते आजही तरुणच आहे, असं नाहीये की नाहीये. पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. साहेबांना मुख्यंमंत्री पदाची शपथ घेऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मला मंगेशला विचारायचं आहे, मुख्यमंत्री फक्त दहाच वर्ष का? ते काय राशन आहे का, असं मिश्लिकपणे म्हटलं. त्यावर मंगेश देसाईंनी उत्तर देत म्हटलं की, जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत, त्याला सचिन पिळगांवकरांनी दुजोरा देत म्हटलं की, असं म्हण ना मग. असंच तुमच्या हातून छान छान काम होत राहो ही अपेक्षा.

महेश कोठारे यांनी काय म्हटलं?

महेश कोठारे यांनी मंगेश देसाई यांचं अभिनंदन करत म्हटलं की, मुख्यमंत्री साहेबांनी त्या सिनेमात एक विशेष संदेश दिला होता. पण तेवढच नाही, ती एक सुंदर कलाकृती होती. प्रसादने त्या सिनेमात उत्तम काम केलं आणि क्षितिज त्या सिनेमात दिसला होता. तेव्हा आम्ही म्हटलं हे एकनाथ शिंदे आहेत. आता त्याच्यावर हा सिनेमा तयार करण्यात आला असं मला वाटतं. त्यानिमित्ताने महेश कोठारे यांनी क्षितीजलाही त्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे महेश कोठारे यांनी म्हटलं की, साहेबांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. साहेब आज तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दोन वर्ष पूर्ण झालीत, पण जे काम तुम्ही केलंय, ते 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. आताच मी कोस्टल रोडवरुन आलो आणि ते मी पाहतच राहिलो. दोन वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिला आहे. कमाल केलीत साहेब तुम्ही. मंगेशने दहा वर्ष म्हटलं पण मी म्हणतो की तुम्ही पुढची वीस वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला सुपरहिट करुन टाका.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow