राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

Jun 29, 2024 - 14:12
 0
राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सरकारने 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरु करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करावी, अशी लक्षवेधी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडली होती. आमदार राम नाईक यांच्यासह इतर आमदारांनी यांनी याला दुजोरा दिला आणि विविध सूचनाही केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना राज्यात लागू करत असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात धोरण, पॉलिसी, नियम ठरवून याबाबत निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

या योजनेसंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू करत असल्याचे म्हटलं. आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पातल्या विविध तरतुदींचा उल्लेख त्यांनी केला. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्‍यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला.

दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नास्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाईड, एकट्या जेष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन आपण राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो, अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी केल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow