जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी

May 29, 2024 - 15:27
 0
जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी

मुंबई : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले.

या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या आंदोलनावरून राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

ठाण्याच जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटानं आंदोलन केले. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. याबाबत आनंद परांजपे म्हणाले की, महाड येथील चवदार तळ्याजवळ जे कृत्य जितेंद्र आव्हाडांनी केले. ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नौटंकीकार आणि नकलाकार जितेंद्र आव्हाड आहेत. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर त्यांनी फाडला. त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबत आंदोलनात दिसणारे जे आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक करावी अशी मागणी आमची आहे.

तर, स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. आव्हाडांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

तर एका भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करत असताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षात राहिलं नाही. विरोधक त्यावर राजकारण करणार, मी मनुस्मृती जाळू नये म्हणूनही राजकारण केले. माझ्या हातून चूक झाली. मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो. मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो आहे म्हणून फाडलं असं नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow