मंडणगडच्या कातळावर ड्रॅगनफ्रूटची यशस्वी लागवड

Jul 10, 2024 - 16:19
Jul 10, 2024 - 16:20
 0
मंडणगडच्या कातळावर ड्रॅगनफ्रूटची यशस्वी लागवड

मंडणगड : ड्रॅगनफ्रूट या विदेशी दिसणाऱ्या फळाची यशस्वी लागवड मंडणगडमधील सेवानिवृत्त अधिकारी मोहन महाडिक यांनी केली आहे. पडिक जागेवर लगडलेले ड्रॅगनफ्रूट पाहिल्यानंतर कातळावर हे पीक येऊ शकते. हे स्पष्ट झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेतीमधून उत्पन्न मिळवण्याचा पर्याय उभा राहिला आहे.

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी राज्यशासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत एक लाख साठ हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान मिळते महाराष्ट्रात सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये ड्रॅगनफूटची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. 

कोकणात जास्त पाऊस पडतो त्यामुळे हे फळपीक येईल का, याची चाचपणी काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांना त्यामध्ये यश मिळत आहे. मंत्रालयातून निवृत्त झालेले मंडणगडचे सुपुत्र मोहन महाडिक यांनी मंडणगड येथील पडिक जमिनीवर नोव्हेंबर २०२२ मध्ये ड्रॅगनफ्रूटची लागवड केली. दीड वर्षानंतर फळधारणा सुरू झाली आहे. याबाबत मोहन महाडिक म्हणाले, ड्रॅगनफ्रूट या फळपिकाच्या लागवडीला कोणत्याही प्रकारची जमीन चालते; मात्र पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. ड्रॅगनफूट हे वेलवर्गीय असल्यामुळे त्याला आधार लागतो. त्यासाठी त्यांनी ६ फूट उंचीचे सिमेंट पोल व २x२ फूट आकाराची सिमेंट प्लेट वापरली आहे. एकूण २०० पोल उभे केले आहेत. 

प्रत्येक पोलवर ४ याप्रमाणे एकूण ८०० ड्रॅगनफ्रूट रोपांची लागवड केली आहे. ड्रॅगनफ्रूटच्या दोन ओळीतील अंतर १० फूट असून दोन पोलामधील अंतर ६ फूट ठेवले आहे. या पद्धतीने एक एकर क्षेत्रावर किमान ५०० पोल बसू शकतात आणि २ हजार रोपांची लागवड करता येते. महाडिक हे कोणतेही रासायनिक खत वापरत नाहीत. ते सेंद्रिय लेंडीखत व सेंद्रिय शेणखत याचा वापर करतात. ड्रॅगनफ्रूट या फळपिकास पाणी फार कमी लागते.
अशी होते लागवड जुलै महिन्यात ड्रॅगनफूटच्या वेलीवर गोगलगायीचा प्रादुर्भाव होतो. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान जास्त असल्याने उन्हामुळे पाने पिवळी पडतात व बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पाने सडतात. वेलीला मे महिन्यात कळ्या येतात. पुढे १५ दिवसात फूल उमलतात. त्यानंतर साधारण ३० ते ३५ दिवसांत पूर्ण फळ तयार होते. सुरुवातीला फळाचा रंग हिरवा असतो तो नंतर जातीनुसार लाल, गुलाबी किंवा पिवळा होतो. कळी लागल्यापासून फळ काढणीपर्यंतच्या काळात मुंग्यांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे फूलगळ आणि फळगळ होते व शेतकऱ्याचे नुकसान होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त
ड्रॅगनफ्रूटमध्ये भरपूर जीवनसत्वे व खनिजे असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. मलेरिया, डेंगु या आजारात पांढऱ्या पेशींची संख्या वाढण्यासाठी या फळाचा उपयोग होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या फळात व्हिटॅमिन सी भरपूर मिळते. ड्रॅगनफ्रूटमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. नियमित सेवन केल्याने त्यातील फायबरमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow