चिपळूणातील नागरिकांना दर १५ ते २० मिनिटांनी पूरस्थितीची माहिती

Jul 16, 2024 - 10:19
Jul 16, 2024 - 11:24
 0
चिपळूणातील नागरिकांना दर १५ ते २० मिनिटांनी पूरस्थितीची माहिती

चिपळूण : मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने शहर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सखल भागात पुराचे पाणी घुसले. पुराच्या शक्यतेने येथील प्रशासन अलर्ट मोडवर राहिले. रविवारी रात्रभर वाशिष्ठीतील पाण्याची पाहणी तसेच विविध ठिकाणी पथके तैनात ठेवली. वाशिष्ठीची पाणीपातळी आणि तालुक्यातील घडामोडींची माहिती सोशल मीडियाद्वारे नागरिकांना दर १५ ते २० मिनिटांनी देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाचे शहरवासीयांनी कौतुक केले. 

रविवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने दुपारी पूरसदृशस्थिती निर्माण झाली. दुपारनंतर वाशिष्ठीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर प्रशासनाकडून नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला. रविवारी दिवसभर आणि रात्रभर महसूल, पोलिस, पालिका, आदी आपत्तीविषयक कामात सहभागी असलेले अधिकारी, कर्मचारी अलर्ट मोडवर होते. २०२१च्या महापुराने शहराचे अपरिमित नुकसान झाले. त्यामुळे कदाचित पुन्हा पूर आल्यास जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला जात होता. 

दुपारनंतर शहरात ९ ठिकाणे बचाव पथके तैनात केली होती. पुराची शक्यता राहिल्याने रात्री तीन वाजेपर्यंत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे हे शहराची पाहणी करून झाल्यानंतर आपत्ती नियंत्रण कक्षातून सातत्याने आढावा घेत होते. सोमवारी पुराचे पाणी ओसरले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow