"...तेव्हाच बहीण-भाऊ आठवतात"; सरकारच्या योजनांवरुन शरद पवारांचा टोला

Jul 17, 2024 - 15:12
 0
"...तेव्हाच बहीण-भाऊ आठवतात"; सरकारच्या योजनांवरुन शरद पवारांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्यापासून तिची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये महिना मिळणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. या घोषणांवरुनच आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी परखड मत मांडले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून ही उचलेली पावले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लाडका भाऊ या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तर लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. याबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी राज्य आर्थिकदृष्ट्या सावरलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

"या अर्थसंकल्पात आपण लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना पाहिल्या. अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जातो. महाराष्ट्रात जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांनाच सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. त्या सहा सात वेळा बहीण भाऊ कुठे आलेले दिसले नाहीत. बहीण भावांचा विचार होतोय ही चांगली गोष्ट आहे. हा सगळा चमत्कार लोकसभेच्या मतांचा आहे. मतदारांनी मते व्यवस्थित दिली की बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. त्याच्याविषयी मला काळजी एकच आहे की, महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती काय आहे? एक काळ असा होता की महाराष्ट्र देशातल्या दोन तीन राज्यांमध्ये होता. परवा नियोजन मंडळाने जी यादी प्रसिद्ध केली त्यात महाराष्ट्राचा क्रमांक ११वा आहे. आपण ११व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो आहे. हे चिंता करण्यासारखे आहे. अंदाचे ६० ते ८० हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. तूट २० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. अर्थसंकल्प मांडल्याच्या आठवड्यातच पुरवणी मागण्या मांडल्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून ही उचलेली पावले आहेत. राज्य आर्थिकदृष्ट्या सावरलं पाहिजे," असं शरद पवार म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow