"विशाळगड येथील घटना सरकार पुरस्कृत, मास्टरमाइंड शोधावा" : विजय वडेट्टीवार

Jul 18, 2024 - 14:01
Jul 18, 2024 - 14:41
 0
"विशाळगड येथील घटना सरकार पुरस्कृत, मास्टरमाइंड शोधावा" : विजय वडेट्टीवार

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, या शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

या दुर्देवी घटनेचा निषेध करत, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे, नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी, हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे

कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दुर्देवी घटना घडविल्या जात आहेत. विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राज्यातील कायदे सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. हे दुर्दैव आहे. विशाळगड येथे तोडफोड होत असताना पोलिसांचे हात कोणी बांधले होते याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. रवी पडवळ खुले आम व्हीडीओवरून धमकी देतो पण त्याला सरकार का पकडत नाही, असा सवाल करत, अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडविला असता तर दुर्देवी घटना घडली नसती. परंतु सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात चौकशीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow