सुट्टीच्या दिवशी रत्नागिरी पुरवठा विभाग-तहसील कार्यालयाने ३ हजार १०० प्रकरणे काढली निकाली

Jul 23, 2024 - 10:03
Jul 23, 2024 - 14:58
 0
सुट्टीच्या दिवशी रत्नागिरी पुरवठा विभाग-तहसील कार्यालयाने ३ हजार १०० प्रकरणे काढली निकाली

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांना रविवारी सुट्टी असतानाही नवीन शिधापत्रिका, नाव कमी जास्त करणे, अद्ययावतीकरण आदी ३ हजार १०० प्रकरणे रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाने निकाली काढली आहेत. मनुष्यबळ कमी असल्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग आणि तहसील कार्यालयाने विशेष मोहीम राबवली होती. त्यामुळे तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होती.

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह पुरवठा अधिकारी सौ.गोरे आणि सहकारी कर्माचारी ही मोहीम राबवण्यासाठी दिवसभर मेहनात घेत होते. शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महात्मा गांधी जनआरोग्य योजनेसाठी शिधापत्रिका अद्ययावतीकरण आवश्यक आहे. याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थांची गर्दी पुरवठा विभाग आणि तहसील कार्यालयात
होत आहे. नियमित कामकाजाबरोबर शिधापत्रिकासाठी केलेल्या अर्जाचा निपटारा करताना पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाने विशेष नियोजन केले. रविवारी सुट्टीच्या दिवशी ही मोहीम राबवण्यात आली.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततसाठी नागरिक पुरवठा विभाग आणि ई-सेवाकेंद्रात धाव घेत आहेत. आधारकार्ड शिधापत्रिका जोडणे, शिधापत्रिकेवरून नाव काढणे आणि नाव चढ़वणे या कामांसाठी पुरवठा विभागात एकच झुंबड उडाली आहे; मात्र पुरवठा विभागात अनेक पद रिक्त असल्याने सध्या ३० टक्केच कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे रोजच्या वाढत्या गर्दीला तोंड देताना कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येक कामाची नोंद शासनाच्या वेबसाईटवर करणे आवश्यक आहे. त्यात शासनाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हे काम वेगाने होत नाहीत, अनेक कामे प्रलंबित राहिलेली आहेत. या कामांचा निपटारा करण्यासाठी तहसीलदार आणि पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली नियमित तलाठीसह प्रशिक्षणार्थी तलाठी आणि कोतवाल यांची मदत घेऊन ही मोहीम यशस्वी करण्यात आली तसेच पुरवठा विभागात आरोप नियोजन करत आलेल्या अर्जाचा निपटारा करण्याचा धडाका पुरवठा विभागाकडून लावण्यात आला.

शासनाच्या नवीन आकृतीबंधानुसार, पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच पुरवठा विभागातील नायब तहसीलदार ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे वाढलेले अर्ज निकाली काढणे कठीण होत आहे. सध्या प्राप्त कर्मचाऱ्यांचे नियोजन लावून अर्ज निकाली काढले जात आहेत. रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी

नुकताच जाहीर झालेल्या योजनांमुळे अचानक पुरवठा विभागात रेशनकार्ड अपडेशनच्या अर्जाचे प्रमाण वाढले. त्या तुलनेत कर्मचारी वर्ग नसल्याने पुरवठा विभाग आणि तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी नेमून रविवारी सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम घेऊन साचलेले ३ हजार १०० अर्जाचा निपटारा केला. राजाराम म्हात्रे, तहसीलदार, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow