रत्नागिरी जिल्ह्यात मनसे पाचही विधानसभा लढणार : अविनाश अभ्यंकर

Jul 30, 2024 - 10:14
 0
रत्नागिरी जिल्ह्यात मनसे पाचही विधानसभा लढणार : अविनाश अभ्यंकर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार उभे करणार आहे. या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुका लढू आणि जिंकू, असा विश्वास मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांचे राज्यभर दौरे होणार आहेत. ते कोकणातही येणार आहेत, त्यांच्या सभाही होतील. पावसाचा अंदाज घेऊन ठिकाणे निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अभ्यंकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मनसे संपूर्ण राज्यभरात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा दौरा सुरू आहे. तालुकानिहाय बैठका सुरू आहेत. भविष्यात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणापर्यंत जाणार आहोत. जिल्ह्यात ५५ गट आणि ११० गण आहेत. तळापर्यंत जाऊन मनसेची ताकद वाढवण्यावर आमचा भर आहे.

सध्या फक्त आढावा घेऊन येथील परिस्थितीची पाहणी करीत आहोत. लाडकी बहीण, लाडका भाऊ करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करा, म्हणजे सगळेजण आशीर्वाद देतील. बोलणं सोपं आहे, पण करणे कठीण आहे. अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण त्यांना घेण्याचा निर्णय राज ठाकरे करतील. खुर्चीसाठी झालेले राजकारण जनतेला आवडलेली नाही. त्यामुळे पर्याय म्हणून सर्वजण मनसेला स्वीकारतील.

रत्नागिरीतील रस्ते बोगस
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरून आलो, तेव्हा पाहिलं सिमेंटच्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. सिमेंटवर खड्डे पडले म्हणजे ते काम किती बोगस आहे, हे लक्षात येते. जेव्हा मनसे येथे उतरेल, तेव्हा ठेकेदाराला समजेल अशी भाषा वापरू आणि दर्जेदार कामे करवून घेऊ. त्यासाठी रत्नागिरीकरांनी राज ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे अभ्यंकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow