रत्नागिरी : गर्भपात प्रकरण- 'त्या' डॉक्टरविरुद्ध तपास सुरूच, कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

Jul 30, 2024 - 10:04
 0
रत्नागिरी : गर्भपात प्रकरण- 'त्या' डॉक्टरविरुद्ध तपास सुरूच, कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

रत्नागिरी : हॉस्पिटलला गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या रुग्णांना देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित डॉक्टरांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, या घटनेचा अद्यापही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती, डॉ. अनंत नारायण शिगवण (वय ६७, रा. टीआरपी, रत्नागिरी) असे संशयित डॉक्टराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टीआरपी येथील हॉस्पिटल येथे निदर्शनास आली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित डॉक्टरकडे वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ व २०२३ मध्ये नमूद आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता व अनुभव नसताना तसेच हॉस्पिटलला गर्भपात केंद्राची मान्यता नसताना संबंधित डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे रुग्णांना देत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पथकासमवेत कथित रुग्णालयावर छापा टाकला. या वेळी गर्भपाताच्या गोळ्या व गर्भपात करण्यासाठी आवश्यक साहित्य असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून संशयित डॉक्टरविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते; मात्र त्या डॉक्टरांना रक्तदाबाचा त्रास वाढू लागल्याने रात्री त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात आले. तसेच संशयित डॉक्टरांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow