चिपळूण : कोयना धरणात आवक वाढली तरच सोडणार पाणी

Jul 30, 2024 - 10:53
Jul 30, 2024 - 11:58
 0
चिपळूण : कोयना धरणात आवक वाढली तरच सोडणार पाणी

चिपळूण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला आहे. धरणातील पाण्याची आवक, सोडलेले पाणी, पाणी साठवण क्षमता व पूर्वेकडील महापुराची स्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवले आहेत. धरणात पाऊस व पाण्याची आवक वाढली तरच जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे; तसेच कोयना प्रकल्पातून मागणीनुसार वीजनिर्मिती सुरू असल्याची माहिती महानिर्मिती कंपनीकडून देण्यात आली.

धरणात प्रतिसेकंद ३७ हजार ४६० क्युसेक पाण्याची आवक होत असून, पूर्वेकडे कोयना नदीपात्रात ३२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ८४.३२ टीएमसी उपलब्ध तर ७९.२० टीएमसी उपयुक्त साठा आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. प्रतिसेकंद सरासरी ३७ हजार ४६० क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवले असून, यातून ३० हजार तर पायथा वीजगृहातील २० मेगावॉट क्षमतेच्या दोन्ही जनित्रांद्वारे ४० मेगावॉट वीजनिर्मिती करून २ हजार १०० असे प्रतिसेकंद ३२ हजार १०० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पूर्वेकडील विभागातील पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत अद्यापही धोकादायक वाढ असल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी साठ्यापैकी आता ८४.३२ टीएमसी साठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे २०.९३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धरणात सध्या ८४.३२ टीएमसी उपलब्ध तर ७९.२० टीएमसी उपयुक्त साठा असून, मागील २४ तासांत धरण साठ्यात ०.८२ टीएमसीने तर पाणी उंचीत ११ इंच वाढ झाली आहे.

पावसाळ्यात राज्यात विजेची मागणी कमी असते. त्यामुळे कोयना प्रकल्पातून मागणीनुसार वीजनिर्मिती केली जात आहे. सकाळी सुमारे दीड तास आणि संध्याकाळी अंदाजे तासभर वीजनिर्मिती केली जाते. प्रांताधिकारी चिपळूण यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत आहोत. - संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow