Breaking : पांढरा समुद्र येथे वाळूचोरांचा महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

Jun 7, 2024 - 16:58
 0
Breaking : पांढरा समुद्र येथे वाळूचोरांचा महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

कराटे नॅशनल चँपियन उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका किक मध्ये दोघांना केले आडवे

रत्नागिरी : शहराजवळील पांढरा समुद्र येथील निर्ढावलेल्या वाळू चोरांनी आज चक्क महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती हर्षलता धनराज गेडाम, वय ४९, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना या पदावर सध्या रत्नागिरीत कार्यरत आहेत. सध्या त्यांची निवासाची व्यवस्था रेमंड रेस्टहाऊस, पांढरा समुद्र येथे करण्यात आली आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास त्या बीचवर मॉर्निंग वॉक साठी गेल्या होत्या. श्रीमती गेडाम या कराटे नॅशनल चँपियन आहेत, शिवाय त्या धनुर्विद्येत देखील पारंगत आहेत. आपल्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने त्या नेहमीच मॉर्निंग वॉक व व्यायाम करतात. आज सकाळी समुद्र किनारी फिरताना त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सुंदर समुद्र किनारा टिपण्याचा प्रयत्न केला. याचवेळी या समुद्र किनाऱ्यावर वाळू भरण्यासाठी २ सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या आल्या होत्या. श्रीमती गेडाम शुटींग करीत असल्याचे पाहून या गाडीतील एका इसमाने आमच्या गाडीचा फोटो काढताय का ? असे विचरले. नाही असे उत्तर दिल्यावर श्रीमती गेडाम पुन्हा रेस्टहाऊस ला जाण्याकरिता निघाल्या. याचवेळी सफेद रंगाची बोलेरो गाडी त्यांच्याजवळ आली. त्यामध्ये वाळू भरलेली होती. आमच्या गाडीचा फोटो तुम्ही काढलात तो मोबाईल आम्हाला द्या असे या गाडीतील इसमांनी सांगितले. याचवेळी एका इसमाने खाली उतरून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता बचावासाठी त्याच्या चेहऱ्यावर पायाने कराटे किक मारली व त्यामुळे तो इसम खाली पडला. ते बगून दुसरा इसम गाडीतील फावडे घेऊन अंगावर मारण्यासाठी धावत आला असता स्वतःचा बचाव करीत त्याला देखील पाठीमागून एक कराटे किक मारून गेडाम यांनी आडवा केला. हि घटना घडताच समुद्रावर उभ्या असणाऱ्या बोलेरो पिकअप गाड्या व ट्रकमधील इसम धावत येऊ लागले असता श्रीमती गेडाम यांनी धावत जाऊन रेमंड रेस्टहाऊस गाठले. त्यानंतर शहर पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. श्रीमती गेडाम यांच्या तक्रारी नुसार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३५२, ३४ नुसार दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती गेडाम यांनी आपल्या मोबाईल मधील सर्व फुटेज पोलिसांना दिले आहे.

निर्ढावलेले वाळू चोर
रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या पांढरा समुद्र येथे राजरोसपणे वाळूचे उत्खनन होते. मात्र शासकीय यंत्रणा याकडे जाणूनबुजून डोळेझाक करते. अनेक यंत्रणांच्या आशीर्वादाने हे उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. समुद्र किनारी होत असणाऱ्या या उत्खननामुळे येथील बंधाऱ्याला देखील धोका आहे. सुमारे २० ते २५ वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे उत्खनन सुरु आहे. आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही या विश्वासामुळे आता हे वाळूचोर निर्ढावले आहेत. याचमुळे एका महिलेवर हल्ला करण्याचे धाडस या चोरट्यांनी केले. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या वाळूचोरांवर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow