राजापूर : सार्वजनिक नळपाणी योजनेच्या पंपाची चोरी झाल्याची सरपंचांची तक्रार

Aug 2, 2024 - 11:11
 0
राजापूर : सार्वजनिक नळपाणी योजनेच्या पंपाची चोरी झाल्याची सरपंचांची तक्रार

रत्नागिरी : सार्वजनिक नळपाणी योजनेच्या पंपाची चोरी झाल्याची तक्रार होळी (ता. राजापूर) येथील सरपंच महेश करगुटकर यांनी नाटे (ता. राजापूर) पोलीस ठाण्यात दिली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत होळी (ता. राजापूर) येथे सुधारात्मक पूर्णजोडणी नळपाणी पुरवठा योजना मंजूर असून या योजनेचे काम चालू असताना पंप जोडण्याच्या वेळी काही ग्रामस्थांनी ही विहीर आमची खाजगी आहे असे सांगून पंप जोडण्यास ठेकेदाराला विरोध केला. त्यामुळे राजापूर पाणीपुरवठा विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून मे महिन्यात पोलीस संरक्षणात विहिरीमध्ये पंप जोडून पाणीपुरवठा सुरू केलाय मात्र ३१ जुलै रोजी काही ग्रामस्थांनी या पंपाची चोरी केली असून तशी तक्रार नाटे पोलीस ठाण्यात देण्यात आली असल्याची माहिती दळेचे सरपंच महेश करगुटकर यांनी दिली.

ठरावीक ग्रामस्थांचा उपद्रव यापूर्वीदेखील सुरू होता. काही कुटुंबे बाहेरची असल्याने त्यांना या विहिरीवरून पाणीपुरवठा करू नये, असे त्यांचे नेहमीच म्हणणे होते. मात्र गावात राहणारे सर्व आपलेच आहेत, त्याप्रमाणे आपण निर्णय घेत असतो. यापूर्वीदेखील एक पंप चोरीला गेला असून त्याचीदेखील रीतसर तक्रार दिलेली आहे. तसेच ग्रामस्थांनीदेखील सुनीता गुरव व प्रियांका प्रकाश गुरव या आमच्याकडून घेतलेल्या पैशाचा हिशोब देत नसल्याच्या लेखी तक्रारी ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत.

त्याअनुषंगाने नाटे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या योजनेचे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे झाले आहे. सुनीता गंगाराम गुरव व प्रियांका प्रकाश गुरव या खासगी योजना राबवत असून शासकीय योजना झाल्यास त्यांची योजना बंद पडेल, याची भीती त्यांना आहे. म्हणून त्या असले प्रकार करत आहेत. त्यांच्या या वागण्याने ५५ कुटुंबांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पंपचोरी, पाइप व इलेक्ट्रिक केबलचे नुकसान करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आपण केली असल्याचे श्री. करगुटकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow