खेड : खवले मांजर तस्करी प्रकरणी चौथ्या संशयिताला अटक

Aug 12, 2024 - 10:17
 0
खेड : खवले मांजर तस्करी प्रकरणी चौथ्या संशयिताला अटक

खेड : तालुक्यातील तळे येथे ३० जानेवारी २०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भरणे येथील काळकाई मंदीरजवळ मुंबई गोवा हायवेनेजीक वनविभागाच्या पथकाने खवलेमांजराची खवले विक्री करण्यासाठी आलेल्या एका टोळीतील एकाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर खवले मांजर शिकार व खवले तस्करी प्रकरणी एकूण तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चौथा आरोपी वन विभागाच्या नजरेआड होता. दि.१ रोजी रायगड जिल्ह्यातील त्याच्या घरातून वनविभागाने त्याला अटक केली असून दि.१० रोजी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी दि.१२ रोजी पर्यंत वन कोठडीत केली आहे.

खेड तालुक्यातील भरणे येथे एक इसम वन्यप्राणी खवलेमांजराची खवले विक्री करण्यासाठी येणार असल्यांची गुप्त माहीती मिळाल्या नुसार दापोली परिक्षेत्रातील कर्मचारी यांना घेऊन सापळा रचुन संबंधित तीन संशयीत आरोपींना अटक केली होती. त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ सुधारणा २०२२ कलम ९, ३९, ४८३, ४९३, ५१, ५२ ३५७ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करून कसुन चौकशी करण्यात आली. चौकशीत या गुन्ह्यामध्ये सहभाग असलेल्या चौथ्या आरोपीची माहिती वनविभागाला मिळाली. चौथ्या आरोपीचा शोध रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच रायगड जिल्ह्यातही सुरुच होता. दि.९ रोजी वनविभागाला मिळालेल्या माहीतीच्या आधारे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित आरोपी दत्ताराम शामा कोंडके (६४ रा. वाघेरे पैकी कडसरी लिंगाणा संभाजीनगर, ता. महाड जि. रायगड) याला त्याच्या घरातुन चौकशीसाठी ताब्यात घेतले, दत्ताराम याला अटक करून त्याची अधिक चौकशी करून शनिवारी १० रोजी रोजी त्याला खेड येथील प्रथम वर्ग-०१ न्यायदंडाधिकारी यांचेसमोर हजर केले असता न्यायालयाने दि.१२ ऑगस्ट पर्यंत वन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. दत्ताराम कोंडके हा आरोपी खुप दिवस फरार होता. वन विभागाने त्याला शिताफिने पकडले. दत्ताराम कोंडके या आरोपीला पकडल्याने खवले मांजराची हत्या कोणी केली याची उकल करण्यास वनविभागाला मदत होणार आहे. ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर आर. एम. रामानुजम यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी वैभव बोराटे, खेड वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक रानवा बंबर्गेकर, अशोक ढाकणे, आदींनी पार पाडली. पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश पाटील करीत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow