अणुस्कुरा घाटाकडे पर्यटकांची वळताहेत पावले

Aug 13, 2024 - 14:56
 0
अणुस्कुरा घाटाकडे पर्यटकांची वळताहेत पावले

राजापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील नागमोडया वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करताना अवखळपणे उंचावरून कोसळणारे घबधबे, दुर्मिळ वन्यजीवांचा वावर आणि पायथ्याशी बसलेल्या वस्तीमुळे होणारा स्वर्गाचा भास याचा अनुभव घेताना पर्यटकांना वेगळीच अनुभूती मिळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अनुस्कुरा घाटाला निसर्गसौंदर्याची झळाली मिळाली असून तिथे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

व्ययसाय, भाजीपाला, दूध यासह विविध वस्तूं‌साठी कोकणवासीयांना पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबुन राहावे लागते. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे अनोखे नाते आहे. या दोन्हीला जोडणारा अनुस्कुरा घाट पावसामुळे निसर्गसौदर्याने नाहून गेला आहे. घाटातील सुळक्यासारखे सुमारे पंधरा-वीस फुटापेक्षा उंचच असलेले मोठे दगड आकाशाला भिडल्यासारखा भास होतो. 

हा घाट हिरवा शालू पांघरल्यासारखा भासत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात रूक्ष वाटणाऱ्या अनुस्कुरा घाटच्या सौंदर्याला झळाळी मिळाली आहे. अनेक ठिकाणी छोटया-छोटया स्वरूपामध्ये शंभरहून अधिक धबधबे कमी-अधिक उंचीवरुन अवखळपणे कोसळत आहेत, या धबधब्याखाली बसून मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही आसुसलेले दिसतात. मात्र अवघड जागांवर हे धबधबे असल्यामुळे तिथे पोचणे अशक्य आहे. येथील धबधब्यांचे उडणारे तुषार रत्यातून जा-ये करत अंगावर झेलताना वेगळा आनंद मिळतो. घाटाच्या पायथ्याशी बसलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहती पाहताना सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमधील अनेक वन्यजीव, प्राण्यांना पाहण्याची अनोखी संधी मिळते. त्यामुळे आपसूकच पर्यटकांचीही पावले या घाट परिसरात आनंद लुटण्यासाठी वळत आहेत.

सोयीसुविधांचा अभाव आहे
अणुस्कुरा घाटाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे. पर्यटकांना राहण्यासाठी चांगली निवास व्यवस्था नाही, पर्यटकांना घाटाची माहिती देणारे गाईड नाहीत, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गाड्यांची सुविधा नाही यांची या ठिकाणी वानवा आहे. या साऱ्या सुविधा उपलब्ध झाल्यास अणुस्कुरा घाट पर्यटकांसाठी वेगळीच मेजवानी ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow