येरडव येथे आढळलेल्या बिबटयाच्या नवजात बछड्याची आईशी घडवणार भेट

Aug 14, 2024 - 12:13
 0
येरडव येथे आढळलेल्या बिबटयाच्या नवजात बछड्याची आईशी घडवणार भेट

राजापूर : तालुक्यातील येरडव पाटीलवाडी येथे नवजात बिबटयाचा बछडा सापडला असून त्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. या बिबटयाची त्याच्या आईशी भेट घालून देण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

रविवार ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास येरडव पाटीलवाडी येथील किसन वसंत दळवी यांना वन्यप्राणी बिबट्या बछडा सापडला असल्याची माहिती तुषार पाचलकर यांना दिली. त्यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून याची माहिती दिली.

त्यानंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन किसन वसंत दळवी यांचे कडून मादी जातीचा बिबट्या बछडा वय सुमारे ७ ते ८ दिवस असून त्याला ताब्यात घेऊन सापडलेल्या ठिकाणी पहाटे पर्यंत बछड्याला मादीला मिळवण्याचा प्रयत्न केला असून मादी आलेली नाही. त्यानंतर वन अधिकारी यांनी या बछड्याला ताब्यात घेतले असून बिबट्या बछड्याला पशुधन विकास अधिकारी राजापूर प्रभात किनरे यांचे कडून तपासणी करून घेतली असता, सदर बछडा सुस्थितीत असल्याची माहिती दिली.

त्या नंतर मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री.वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यास मादीला मिळवण्याचा प्रयत्न चालू आहेत. या कामगिरी साठी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनपाल लांजा दिलीप आरेकर,वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक कांदळवन किरण पाचार्णे व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, निलेश म्हादये उपस्थित होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने किरण ठाकूर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow