देशभरातील डॉक्टर आजपासून संपावर.. कोणत्या वैद्यकीय सेवा सुरू अथवा बंद राहणार जाणून घ्या…

Aug 17, 2024 - 10:37
 0
देशभरातील डॉक्टर आजपासून संपावर.. कोणत्या वैद्यकीय सेवा सुरू अथवा बंद राहणार जाणून घ्या…

पुणे : कोलकत्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या निमित्ताने डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून संपावर असून, आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित संप पुकारला आहे. देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार असून, अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मुख्यालयाने याबाबत पत्र काढले आहे. त्यात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. व्ही. अशोकन आणि मानद सचिव डॉ. अनिलकुमार नायक यांनी कोलकत्यातील घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कोलकत्यातील घटनेचा तपास योग्य रीतीने करण्यात आला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कोलकत्यातील रुग्णालयावरही हल्ला करण्यात आला असून, त्यात पुरावे नष्ट झाले असण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

डॉक्टरांवरील हल्ले वाढले असून, महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील आधुनिक वैद्यक पद्धतींचा अवलंब करणारे डॉक्टर शनिवारी (ता. १७) पहाटे ६ ते रविवारी (ता. १८) पहाटे ६ वाजेपर्यंत संपावर असतील. या कालावधीत डॉक्टर बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवतील. याच वेळी अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहतील, असे असोसिएशनने नमूद केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची मागणी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांकडे करीत आहोत. त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने आम्हाला संपाचे पाऊल उचलावे लागले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सुरक्षा उपाययोजनांसाठी सरकारने ठोस पावले तातडीने उचलावीत. याचबरोबर नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देताना राष्ट्रीय वैद्यक परिषदेने सुरक्षेच्या अंगानेही विचार करावा. -डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow