ज्यांचे फॉर्म रखडले, त्यांना तीन महिन्याचे एकदम 4500 रुपये देणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Aug 17, 2024 - 15:24
 0
ज्यांचे फॉर्म रखडले, त्यांना तीन महिन्याचे एकदम 4500 रुपये देणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पुणे : ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना तीन महिन्यांचे 4500 रुपये एकदम देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

पुण्यात (Pune) आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथे होत आहे. सुरुवात पुण्यापासून का? असे मला विचारले एकाने विचारले होते. ज्यावेळेस परकियांचे आक्रमण आमच्यावर झाले त्यावेळेस आई जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांगितले की. महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे ठिकाण आहे, असे त्यांनी म्हटले.

प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही

ते पुढे म्हणाले की, आपले सरकार देना बँक सरकार आहे. याआधीच सरकार लेना बँक सरकार होते. मागच्या काळातील सरकार वसुली करणारे सरकार होतं. आत्ताचे सरकार बहिणींना देणारे सरकार आहे. त्यामुळे आज आपण ठरवले पुण्यापासून सुरुवात करायची. पण पुण्यापासून जरी औपचारिक सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितले पैसे क्रेडिट करणे सुरू करा. आता एक कोटी तीन लाख महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत. आता थोड्या महिला बाकी आहेत. पण काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही

31 जुलैपर्यंतचे फॉर्मचे पैसे जमा केले आहेत. 31 ऑगस्टपर्यंतच्या फॉर्मचे पैसे जमा होताना महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत. सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही सगळे पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्यावेळी सावत्र भावांच्या पोटात खूप दुखलं

ज्या वेळेस आम्ही या योजनेची घोषणा केली त्यावेळेस तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखलं. सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले की, योजना होऊ नये म्हणून पहिल्यांदा कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म आम्ही सरकारला दिले होते. मात्र, सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाहीत. काही ठिकाणी मोटरसायकलचे फोटो लावले. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांपर्यंत पैसे पोहोचू नये, असा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला. हे पोर्टल स्लो व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे चार-पाच दिवस ते पोर्टल बंद होते. चार-पाच लोकांनी हाहाकार सुरू केला की, पोर्टल बंद पडले आहे. पोर्टल बंद पडले तरी आम्ही ऑफलाइन फॉर्म स्वीकारले. ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि आमच्या बहिणींना पैसे देण्याचा आमचा निर्धार पूर्ण केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow