Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले?; राज ठाकरे संतापले

Aug 20, 2024 - 15:21
 0
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले?; राज ठाकरे संतापले

◼️ महाराष्ट्र सैनिकांना केली महत्त्वाची सूचना

मुंबई : बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागला.

यामुळं बदलापूरच्या नागरिकांनी आज आक्रमक भूमिका घेत सकाळपासून रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरु केलं आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे रुळांवरुन बाजूला होण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, नागरिकांकडून बदलापूरमध्ये(Badlapur Case) आंदोलन सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन महाराष्ट्र सैनिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत विषय लावून धरावा, असं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे बदलापूरच्या घटनेबाबत म्हणाले की," बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या."

नेमकं प्रकरण काय?

बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार 12 ऑगस्ट रोजी झाला होता. या प्रकरणातील आरोपी शाळेत 1 ऑगस्ट रोजी कामावर कंत्राटी पद्धतीनं रुजू झाला होता. आरोपी अक्षय शिंदे यानं लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनानं माफीनामा सादर केला असून मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये दिरंगाई झाल्याचं समोर आलं. पीडित मुलीच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला 12 तास वाट पाहायला लागली. यानंतर आज बदलापूरमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मुद्दा लावून धरला. आता आरोपींना शिक्षा होई पर्यंत हा विषय लावून धरा, असं राज ठाकरे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow