राज्यातील धरणांमध्ये ७६.७४% जलसाठा

Aug 30, 2024 - 14:03
 0
राज्यातील धरणांमध्ये ७६.७४% जलसाठा

पुणे : जलसंपदा विभागाच्या राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या या धरणांमध्ये ७६.७४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवसांत ६७.७८ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ९२.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांपेक्षा हा पाणीसाठा जास्त आहे. या उलट छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत कमी (४५.२० टक्के) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या विभागात अजूनही टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

राज्यात जुलैपासून मुसळधार तसेच काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या जवळजवळ सर्वच नद्यांना पूर आले. दोन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे मराठवाडा वगळता उर्वरित भागांतील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. अजून मान्सूनचा सप्टेंबर बाकी आहे. याही महिन्यात सर्वच भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यानुसार पाऊस पडल्यास उर्वरित धरणेदेखील १०० टक्क्यांच्या आसपास भरतील, असा अंदाज जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. राज्यात नागपूर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत लहान आणि मोठे असे मिळून एकूण २ हजार ९९७ धरणे आहेत. प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांची साठवण क्षमता १४३०.६३ टीएमसी एवढी आहे.

अशी आहे साठवण क्षमता
पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी, कोकण विभागातील धरणांची पाणी साठवण १३०.८४ टीएमसी, नाशिक विभाग पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी, छत्रपती संभाजीनगर विभागपाणी साठवण क्षमता २५६.४५ टीएमसी आहे. अमरावती पाणी साठवण क्षमता १३६.७५ टीएमसी, तर नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १६२.७० टीएमसी आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow