ब्राझीलमध्ये X वर बंदी

Aug 31, 2024 - 16:19
 0
ब्राझीलमध्ये X वर बंदी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस मॉरिस यांनी मस्क यांची सोशल मीडिया दिग्गज कंपनी एक्स (X) ला ब्राझीलमध्ये सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी देण्यात आलेल्या या निर्णयाने दोन व्यक्तींमधील अभिव्यक्ती स्वतंत्र्य आणि चुकीच्या माहितीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता आणखी वाढला आहे.

तत्पूर्वी, जस्टिस मॉरिस यांनी, आपण ब्राझीलमध्ये आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी 24 तासांच्या आत स्थानिक प्रतिनिधीची नियुक्ती केली नाही तर, आपली सर्व्हिस सस्पेंड करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता हा निर्णय समोर आला आहे. या निर्णयानंतर मस्क यांनी आदेश देणाऱ्या न्यायाधीशांवर निशाणा साधला आहे.

मस्क भडकले...!
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक मस्क यांनी संतापाच्या भरात प्रतिक्रिया देत, मॉरीस यांना "न्यायाधीश म्हणून काम करणारा एक दुष्ट हुकूमशहा", असे संबोधले आहे आणि त्यांच्यावर "ब्राझीलमधील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न" केल्याचा आरोपही केला आहे. मस्क यांनी एक्सवर लिहिले आहे, "स्वतंत्र अभिव्यक्ती हा लोकशाहीचा पाया आहे आणि ब्राझीलमध्ये एक निवडून न आलेला न्यायाधीश राजकीय हेतूने याचा नाश करत आहे."

असं आहे संपूर्ण प्रकरण -
महत्वाचे म्हणजे, हे प्रकरण एप्रिल महिन्यापासून सुरू झाले होते. तेव्हा मॉरिस यांनी 'एक्स'संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवणाऱ्या अनेक अकाउंट्सचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुरुवातीला, X च्या टीमने ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अनेक अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, अकाउंट ब्लॉक करणाऱ्या टीमने ती का ब्लॉक केली? ते सरकारच्या कोणत्या कायद्याचे उल्लंघन करतात? हे सांगितले नाही. ब्राझील हे एक्ससाठी एक महत्वाचे मार्केट आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow