Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाविकास आघाडीचे दमदार यश;, काँग्रेस-उद्धवसेना-शरद पवारांकडे ३०; भाजप-शिंदेसेना-अजित पवारांना १७ जागा

Jun 5, 2024 - 10:10
Jun 5, 2024 - 10:12
 0
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाविकास आघाडीचे दमदार यश;, काँग्रेस-उद्धवसेना-शरद पवारांकडे ३०; भाजप-शिंदेसेना-अजित पवारांना १७  जागा

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेचे मैदान जिंकताना महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत दमदार यश संपादन केले. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले.

काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंनी ९ तर शरद पवार यांच्या पक्षाने ८ जागांवर विजय मिळविला. भाजपने ९, शिंदेसेनेने ७ तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष विशाल पाटील विजयी झाले.

गेल्यावेळी ४१ जागा जिंकणाऱ्या युतीमध्ये फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी सहभागी झाली पण गेल्यावेळपेक्षा निम्म्याहून चार जागा यावेळी कमीच मिळाल्या. थेटच सांगायचे तर शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यावर मोठी मात केली. भाजपने २८ जागा लढल्या आणि केवळ ९ जिंकल्या. काँग्रेसने १७ जागा लढल्या आणि १३ जिंकत खणखणीत यशाला गवसणी घातली. देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीची लढत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रचंड बहुमताने जिंकली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसला. प्रमुख पराभूत उमेदवारात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर, डॉ. हीना गावित, नवनीत राणा, प्रताप पाटील चिखलीकर, चंद्रकांत खैरे, डाॅ. सुजय विखे पाटील यांचा समावेश आहे. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, पीयूष गोयल, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, सुनील तटकरे यांचा समावेश आहे. सांगलीत भाजप व उद्धव सेना या दोघांनाही धक्का देत अपक्ष विशाल पाटील जिंकले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow