फडणवीस साहेब, मला राजकारणात जायचं नाही, पण आरक्षण दिलं नाही तर....; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Sep 2, 2024 - 14:20
 0
फडणवीस साहेब, मला राजकारणात जायचं नाही, पण आरक्षण दिलं नाही तर....; मनोज जरांगे पाटलांचा  इशारा

पुणे : फडणवीस साहेब मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, आमच्या समाजाला ही राजकारणात (Politics) जायचं नाही. पण मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार, असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे.

मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आज भीमाशंकरला निघालोय, दुपारी दोन वाजता दर्शन घेईन. आमचा दौरा गेल्या आठवड्यात ठरला होता. काल रात्री समजलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही येतायेत. मात्र त्यांची वेळ मला माहित नाही. आम्ही आमच्या नियोजनानुसार जाणार आहोत. भीमाशंकर चरणी आरक्षणासाठी साकडं घालू, भीमाशंकर या सरकारला सद्बुद्धी देईल. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. देवाच्या दारात थोडी अशी चर्चा करतात, चर्चा ही मुंबईलाच होऊ शकते. मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, माझी ती इच्छा नाहीच. तसं असतं तर जाहीर केलं असतं इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा. मला माझा स्वार्थ पाहायचा नाही, समाजासाठी लढायचं आहे, असे त्यांनी म्हटले.

भाजपमधील मराठ्यांची फडणवीसांवर नाराजी

ते पुढे म्हणाले की, सरकारला आमची विधानसभेची भूमिका पाहायची होती, मात्र त्यांनी निवडणुका पुढं ढकलल्या मग आम्ही पण आमचा निर्णय पुढं ढकलला आहे. विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आत्ताच सांगणार नाही. लोकसभेला समाजाने यांना ताकद दाखवून दिली आहे. विधानसभेतही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत, मात्र समाजासोबत विधानसभेबाबत मी चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवारचं उमेदवार आहेत. राजकीय अनेक नेते जे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत, ते मला भेटायला येतात. मात्र मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10 वर्षे कामं करतोय आणि तीन पक्ष एकत्र आलेत. मग आमचं काय होणार, आम्हाला हे घराणं नको, दुसरा म्हणतो ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

लाडकी बहीण योजना चांगली, पण आरक्षणाचे काय?

राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळला, याची सखोल चौकशी व्हावी. फक्त याचं राजकारण करू नका, आरडाओरडा करून तुम्ही हा विषय मागे पाडण्याचा डाव करत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तर महायुती आणि मविआमधील नाराजांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू? विधानसभा लढायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार, मग समाजाने ठरवावं. आमची एकजूट असल्यानं कोणी कोणाचे पाय खेचणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेवरून मनोज जरांगेंनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. लाडकी बहीण योजना आणली, ही चांगलीच आहे. पण आरक्षणाचे काय? दाजी तर चिखलात काम करून मेला की, त्याचं काय. ते फक्त नादी लावतात. बरं हे सगळं आमच्या करातून सुरु आहे. कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देतंय, असे त्यांनी म्हटले.

जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत. त्यांना आम्ही शत्रूही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. मराठेच मराठ्यांच्या अंगावर ते सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन् आमदारांना काम करू देत नाहीत, अगदी आरक्षणाबाबत ही बोलू देत नाहीत. फडणवीस साहेब मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, आमच्या समाजाला ही राजकारणात जायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow