विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्यात; मला ज्यादिवशी लोक घरी पाठवतील, त्यादिवशी.. : देवेंद्र फडणवीस

Aug 31, 2024 - 14:43
Aug 31, 2024 - 14:49
 0
विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्यात; मला ज्यादिवशी लोक घरी पाठवतील, त्यादिवशी.. : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप करताना भाषेचा स्तर खालावला आहे. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. मला विष पचवायची सवय आहे, असे सांगताना फडणवीसांनी त्यांच्या राजकारणामागची भूमिका स्पष्ट केली.

एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी राजकारणात जेव्हा आलो, त्यावेळी एकच गोष्ट शिकलो की, राजकारणात तुमच्याकडे संयम असला पाहिजे. शिव्या ऐकण्याची सवय असली पाहिजे. तुम्हाला विष पचवता आले पाहिजे. आता तर गेली दोन वर्षे तुम्ही बघतच आहात. मी किती विष पचवतो. त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे", असे मिश्कील विधान फडणवीसांनी केले.

"राजकारणात पदे भोगण्यासाठी आलो नाही"

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हे सगळे करून मला असे वाटते की, शेवटी आपले ध्येय काय आहे. राजकारणात पदे भोगण्या करता आलेलो नाही. संपत्ती तयार करण्यासाठी आलो नाही. २५ वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. कुठलीही शाळा उघडली नाही. कॉलेज उघडले नाही. साखर कारखाना उघडला नाही. सुतगिरणी उघडली नाही. कुठलेही स्वतः करिता वैयक्तिक साम्राज्य तयार केले नाही. केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल, ती करण्या करिता इथे आहे."

फडणवीस म्हणाले, "मला धंदाच नाहीये"

"माझे स्टेक्स (भागभांडवल) काहीच नाहीत. अनेक लोकांना राजकारण या करिता टिकवायचे असते की, राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो. मला धंदाच नाहीये. त्यामुळे मला ज्यादिवशी लोक घरी पाठवतील, त्यादिवशी शांतपणे घरी जाईन", असे भाष्य फडणवीस यांनी केले.

"मी मनुष्य आहे. मला राग कधी कधी येतो. पण, तरीदेखील मी हे निश्चितपणे सांगेन की, विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे. त्यामुळे मी विष पचवत असतो आणि पुढे जात असतो", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow