मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेस चिपळूणमध्ये प्रारंभ

Sep 3, 2024 - 13:22
Sep 3, 2024 - 13:26
 0
मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेस चिपळूणमध्ये प्रारंभ

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात पार पडले. या वर्षातील ही पहिलीच आंतर विभागीय स्पर्धा असून स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकण अशा चार विभागातील निवड झालेले प्रत्येकी ६ मुले व ६ मुली अशा ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

ठाण्याच्या फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाड याला स्पर्धेचे अग्रमानांकन देण्यात आले असून फिडे रेटिंग प्रणालीनुसार मुंबई शहरच्या अथर्व जाईल याला दुसरे व नील शिंत्रे यास तृतीय मानांकन देण्यात आले. मुलींच्या गटात मुंबई शहरच्या वूमन कँडिडेट मास्टर क्रिती पटेल हिला अग्रमानांकन देण्यात आले असून अव्रील डेविडला द्वितीय तर युती पटेलला तृतीय मानांकन देण्यात आले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, स्पर्धेचे निवड समिती अध्यक्ष चंद्रकांत नाईक, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विवेक सोहोनी, वरिष्ठ महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन डॉ. सम्राट माने, कनिष्ठ महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन प्रा. विलास जोशी, जिमखाना विभाग प्रमुख वामन जोशी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, कोकण झोन सचिव स्पर्धेचे निवड समिती सदस्य शशांक उपशेटे उपस्थित होते. दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धा स्विस लीग पद्धतीने होत असून एकूण ५ फेऱ्या खेळविल्या जाणार आहेत. त्यातील दोन फेऱ्यांच्या अंती मुंबई शहर व ठाणे विभागाने वर्चस्व दाखवले असून आज दि. ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या डावांत मुंबई उपनगर व कोकण विभागाला मुसंडी मारण्याची संधी आहे. स्पर्धेत निवड झालेले खेळाडू अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत. विद्यापीठ आणि जिमखाना विभाग सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, येणाऱ्या वर्षांत ह्या स्पर्धांना अधिक बक्षिसे व खेळाडूंना त्यांच्या अपेक्षांचा विचार करून यथायोग्य सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow