रत्नागिरी वाचवण्यासाठी नव्या फोरमची गरज : बाळ माने

Sep 4, 2024 - 12:57
 0
रत्नागिरी वाचवण्यासाठी नव्या फोरमची गरज : बाळ माने

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये आवश्यक वैद्यकीय सेवा दर्जेदार मिळणे आवश्यक आहे, रत्नागिरी वाचवा, विकसित रत्नागिरीसाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते भाजप पदाधिकारी एकत्र येऊन योगदान देऊया. आपण समस्या निवारण केंद्र सुरू करत नसून हा फोरम आहे. आरोग्य व्यवस्था १०० टक्के सुधारलोच पाहिजे. हे आपल्या रत्नागिरीसाठी करतोय हे रुजवले पाहिजे यातून रत्नागिरी पैटर्न विकसित करूया, असे प्रतिपादन माजी आमदार बाळ माने यांनी केले.

भाजपतर्फे रत्नागिरीच्या आरोग्य सुविधांवर रात्री (जिल्हा) नगर वाचनालयात आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. कल्पना मेहता म्हणाल्या, या विषयाची व्यापती खूप मोठी आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी निधी मिळणे आवश्यक आहे. अपुरा वीजापुरवठा होतो. इंटरनेट, वायफाय पुरेशी सुविधा नाही.

कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी भरत नाहीये, विविध सरकारी, योजनांची माहिती देणारी यंत्रणा नाही याकरिता समुपदेशक सल्लागारांची आवश्यकता आहे. डॉ. अरूण डिंगणकर यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्या मांडल्या रक्तदानासंबंधी उपयुक्त माहिती दिली. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अतुल बगे म्हणाले, आरोग्य व्यवस्थेकरिता निधी अपुरा
पडतो. त्यामुळे अनेक उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ घेता येत नाहीत, भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भाग आहे. रुग्ण अत्यवस्थ असल्यास त्याला उपचारांकरिता आणणे शक्य होत नाही. सरकारी व खासगी रुग्णालयात पुरेसे कर्मचारी, नर्सेस, वॉर्डबॉय नाहीत. कार्यक्रमात जागृत नागरिकांनी वैद्यकीय सेवा, सुविधा सुधारण्यासाठी काही सूचना केल्या, काही अनुभव मांडले. या सा-यांची नोंद करून ठेवण्यात आली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्षा अॅड दीपक पटवर्धन यांनी स्वागत करून आही चर्चासत्रे विकसित रत्नागिरीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. सतीश शेवडे यांनी आभार मानले.

डॉ. नीलेश नाफडे यांनी सांगितले, २५ वर्षे नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरची पुन्हा नोंदणी करावी लागते. सरकारकडे पैसे भरावे लागतात; परंतु ही नोंदणी वेळेवर करून मिळत नाही, आम्हाला जर त्रास देणार असाल तर सेवा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात बोलवू नका. आम्ही मदतीकरिता जातो. रत्नागिरीमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जरी सर्जन, स्पाईन सर्जन, हिप्नो सायकॉजॉस्ट, पेडिअट्रिक सर्जन नाही. येथे नवीन डॉक्टर्स आले पाहिजेत. जुन्या अनेक समस्या सोडवल्या जात नसल्याने नवीन डॉक्टर्स येत नाहीत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:25 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow