दापोली : कोंढे ग्रामसभेला बोलावूनही कृषी सहायक हजर नाहीत

Jun 17, 2024 - 14:23
 0
दापोली : कोंढे ग्रामसभेला बोलावूनही कृषी सहायक हजर नाहीत

दापोली : कृषी विभागाच्या विविध योजना, फळबाग लागवड, बी-बियाणे आदीची माहिती ही गावातील लोकांपर्यंत पोहोचायला हवी, यासाठी कृषी सहायक यांनी कोंढे ग्रामसभेत येऊन लोकांना माहिती द्यावी, असे कृषी सहाय्यक यांना सांगूनही कोंढे ग्रामसभेला कृषी सहायक आले नाहीत. त्यामुळे दापोली तालुका कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोंढे ग्रामसभेत कृषी सहायक माहिती देण्यासाठी आले नाहीत म्हणून सभेच्या ठरावानुसार एक पत्र दापोली तालुका कृषी विभाग यांना देण्यात येणार आहे. राज्य प्रशासनाचा कृषी विकासासाठी काम करणारा गावातील घटक म्हणून कृषी सहायक यांची नेमणूक आहे. त्याचे कार्यक्षेत्र कार्यालयातून नेमून दिलेल्या गावांपुरते मर्यादित असते. गाव पातळीवर कृषी विषयक माहिती पुरविणे हे काम कृषी सहायक यांचे असून त्याच्यावर तालुका कृषी अधिकारी यांचे नियंत्रण असते.

सुधारित व संकरित बी बियाण्यांचा प्रचार व प्रसार करणे, शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, पाणलोट क्षेत्र विकास, मृद व जलसंवर्धन कार्यक्रम आणि कृषी विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, आपत्कालीन सर्वेक्षण व मदत करणे, गावाचा वार्षिक कृषी आराखडा तयार करणे व तो ग्रामसभेत वाचणे, इत्यादी कामे कृषी सहायक गाव पातळीवर करतो, असे असतानाही कृषी सेवक ग्राम सभांना दांडी मारू लागले आहेत. याबाबत ग्रामस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करत असता अधिकारी फोन उचलत नाहीत.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय देखील शहराबाहेर जालगाव येथे असून कार्यालय चार माळ्यावर असल्याने शेतकरी एकदा गेला की परत कार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या बाबत कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांना योजनांचा लाभ मिळेल अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow