भारत आणि सिंगापूर देशांमध्ये सेमीकंडक्टरसह अनेक करार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ब्रुनेईचा दौरा पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता सिंगापूरला पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदी सिंगापूरच्या संसदेत पोहोचले. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशातील मंत्री आणि शिष्टमंडळातील सदस्यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामध्ये सेमीकंडक्टरवरील महत्त्वपूर्ण कराराचाही समावेश आहे.
भारत आणि सिंगापूर यांच्यात गुरुवारी नरेंद्र मोदी आणि लॉरेन्स वोंग यांच्या उपस्थितीत अनेक क्षेत्रांमधील करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी, हेल्थ अँड मेडिसीन, एज्युकेशनल कॉरपोरेशन अँड स्किल डेडेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. दरम्यान, भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारी संदर्भात सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. दोन्ही देश सेमीकंडक्टर क्लस्टर डेव्हलपमेंट आणि सेमीकंडक्टर डिझाइनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगवर भर देतील.
गेल्या काही दशकांमध्ये सिंगापूरने जागतिक सेमीकंडक्टर व्हॅल्यू चेनमध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. सिंगापूर आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन्ही इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करत आहे. सिंगापूरमधील विद्यापीठांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा हा दौरा होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 05-09-2024
What's Your Reaction?