चिपळुणमध्ये विजेचा खेळखंडोबा; व्यापारी, नागरिक त्रस्त

Sep 10, 2024 - 11:09
 0
चिपळुणमध्ये विजेचा खेळखंडोबा; व्यापारी, नागरिक त्रस्त

चिपळूण : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच चिपळूण शहराबरोबरच ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. या प्रकारामुळे व्यापारी, नागरिक यांच्याबरोबरच चाकरमानीही कमालीचे हैराण झाले आहेत. सणासुदीच्या दिवसांत दहा-दहा, पंधरा-पंधरा मिनिटांनी वीज गायब होत असल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चिपळूण शहर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशभक्तांनी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई, सजावट, विविध देखावे साकारले आहेत. आरती, पूजा, भजन यांसह धार्मिक कार्यक्रमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेत खरेदीचा उत्साह आहे. अशातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने गणेशभक्त, व्यापारी वर्ग मेटाकुटीस आले आहेत. ग्रामीण भागातही महावितरणच्या कारभाराचा फटका चाकरमान्यांना बसत आहे.

दिवसातून वीस ते पंचवीस वेळा वीज गायब होत आहे. यामुळे इलेक्ट्रीक उपकरणे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी चिपळूण पंचायत समितीची आमसभा पार पडली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावेळी, गणेशोत्सवात ग्राहकांचा बीज पुरवठा सुरळीत ठेवा, अशा स्पष्ट सूचना आमदार शेखर निकम यांनी दिल्या होत्या. मात्र त्यांच्या सूचनांना महावितरणकडून केराची टोपली दाखविल्याचाच प्रकार सध्याच्या कारभारावरून दिसून येत आहे.

सावर्डे भागातही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून गणेश भक्तांचा हिरमोड होत आहे. रात्री अपरात्री दोन ते तीन तासही वीज गायब असते. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली विद्युत रोषणाई तसेच भक्तांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. यामुळे महावितरणने आपल्या सेवेमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow