चिपळूण : मिरजोळी ग्रामपंचायतला प्रांताधिकऱ्यांची नोटीस

Jul 27, 2024 - 10:48
Jul 27, 2024 - 13:51
 0
चिपळूण : मिरजोळी ग्रामपंचायतला प्रांताधिकऱ्यांची नोटीस

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर उक्ताड येथे पावसाळ्यात पाणी साचण्याचे नवीन ठिकाण तयार झाले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी मिरजोळी ग्रामपंचायतला येथील प्रांताधिकऱ्यांनी नोटीस काढ़ली आहे.

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने मिरजोळी गाव वसलेले आहे. चिपळूण शहराला लागून असलेला आणि मिरजोळी गावाच्या हद्दीतील उक्ताडचा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे. या ठिकाणी उंच इमारती उभ्या आहेत तसेच व्यावसायिक गाळे आणि पक्की दुकाने तयार झाली आहेत. येथूनच उक्ताड बायपास काढण्यात आला आहे. तो पुढे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. हा भाग पूर्वी पुरापासून सुरक्षित मानला जात होता, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या खाडीपट्टा आणि गुहागरमधील दुर्गम भागात राहणारे लोक येथे शिक्षण आणि वैद्यकीय कारणासाठी सदनिका घेऊन राहू लागली, येथे इमारती आणि दुकानांसाठी गाळे बांधताना चक्क गटार बुजवून बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नाही. परिणामी, डोंगरातून येणारे पाणी रस्त्यावरून वाहते यावर्षीपासून ही समस्या तीव्र स्वरूपात जाणवू लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर उक्ताड येथे चक्क रस्त्यावर तळे साचते. दीड फुटापर्यंत पाणी असताना वाहनचालक कसरत करून पाण्यातून वाहने काढतात. त्यापेक्षा जास्त पाणी साचले तर गुहागर-विजापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाते. ती गुहागर बायपासमार्गे वळवली जाते. यावर्षीच्या पावसाळ्यात चक्क तीनवेळा येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी या भागाची पाहणी करून ग्रामपंचायतीला नोटीस काढली आहे. साचणाऱ्या पाण्यावर उपाययोजना करण्याची सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आली आहे.

उक्ताड येथे गटार बुजवून अनधिकृत इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. ते काढण्यासाठी आम्ही संबंधित जागामालकांना नोटीस काढली आहे. तहसीलदारांना या संदर्भात कळवले आहे. एका ठिकाणी महावितरणचे रोहित्र रस्त्यावर असल्यामुळे नाला रूंद करता येत नाही. ते रोहित्र काढण्याची सूचना महावितरणला केली आहे. अनधिकृत बांधकाम तातडीने हटवले तर पुढील उपाययोजना करणे शक्य आहे.- सुभाष माळी, ग्रामसेवक, मिरजोळी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow